निमवैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी उत्तराखंडातून दिल्लीत आलेल्या २३ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचे पडसाद देशभरात उमटलेले असतानाच या प्रकरणातील चौघा आरोपींना पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. दोघे जण अद्याप फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात शोधसत्र आरंभले आहे.
मूळची उत्तराखंडची असलेली ‘ती’ तरुणी रविवारी रात्री आपल्या मित्रासमवेत द्वारका येथे परतत असताना तिच्यावर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेचे पडसाद देशभर उमटले. तरुणीच्या मित्राचा जबाब आणि बसमधील सीसीटीव्हीचे फुटेज याच्या आधारे चौघांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी मंगळवारी सांगितले. बसचा चालक रामसिंह, त्याचा भाऊ मुकेश, व्यायामशाळेतील प्रशिक्षक विनय शर्मा आणि फळविक्रेता पवन गुप्ता अशी या चौघांची नावे आहेत. ज्या बसमध्ये बलात्काराची घटना घडली ती शाळेसाठी वापरली जात असे. त्यानंतर तिचा व्यावसायिक वापर होत असे. रविवारी रात्री हे चौघे व त्यांचे आणखी दोन साथीदार असे सहाहीजण बसमधून फिरायला निघाले होते. त्यांनी मुनिरका बस थांब्याजवळ संबंधित तरुणी व तिच्या मित्राला थांबलेले पाहिले. त्यांनी ही बस द्वारका येथे चालली असल्याची बतावणी करत या दोघांनाही आत घेतले. त्यानंतर सर्वानी तरुणीची छेड काढायला सुरुवात केल. मित्राने त्यांना विरोध केला असता त्यांनी त्याला लोखंडी सळीने मारहाण केली. तरुणी त्याच्या बचावार्थ पुढे आली असता तिलाही या चौघांनी मारहाण केली व त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या दोघांनाही महिपालपूर फ्लायओव्हरजवळ फेकून देण्यात आले. आरोपींपैकी चालक रामसिंह याच्याकडे संबंधित मार्गावर गाडी चालवण्याचा परवाना नव्हता. या सर्वाना पोलिसांनी अटक केली असून उर्वरीत दोघांचा शोध सुरू असल्याचे कुमार यांनी सांगितले.
चारही आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असून त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कुमार म्हणाले. बलात्कारासाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असली तरी या सर्वाना मृत्यूदंड व्हावा यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.     
‘ती’ तरुणी अद्याप अत्यवस्थच
‘त्या’ तरुणीच्या जिवाला असलेला धोका अद्याप टळलेला नाही. येत्या ४८ ते ७२ तासांपर्यंत तिच्या प्रकृतीवर तज्ज्ञांचे बारीक लक्ष असेल असे सफदरजंग रुग्णालयाने मंगळवारी सांगितले. ही तरुणी शुद्धीवर आली असली तरी तिच्या जिवाला असलेला धोका टळला नसल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. डी. अथानी यांनी सांगितले. तिच्या प्रकृतीवर दोन ते तीन दिवस लक्ष ठेवले जाईल असेही त्यांनी नमूद केले. संबंधित तरुणीच्या प्रकृतीचा आढावा वेळोवेळी घेतला जात असून विशेष वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक त्यासाठी तैनात करण्यात आले आहे.