नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिर- बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर चार फेरविचार याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले होते,की सदर वादग्रस्त जागा रामलल्ला विराजमानच्या मालकीची असून तेथे राममंदिर उभारण्यात यावे यासाठी ट्रस्टची स्थापना करावी. याशिवाय मशिदीसाठी अयोध्येत मध्यवर्ती ठिकाणी पाच एकर जागा मशीद बांधण्यासाठी देण्यात यावी.

या निकालावर आव्हान देणाऱ्या याचिका मौलाना मुफ्ती हसबुल्ला, महंमद उमर, मौलान महफूजर रेहमान व मिशबहुद्दीन यांनी दाखल केल्या आहेत. त्यांना अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाने पाठिंबा दिला आहे.

या चार याचिकाकर्त्यांचे वकील एम.आर शमशाद यांनी सांगितले,की अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाने १७ नोव्हेंबर रोजी या प्रकरणी फेरविचार याचिकांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.  २ डिसेंबर रोजी पहिली फेरविचार याचिका मौलाना सय्यद अशाद रशिदी यांनी दाखल केली होती.