पुढच्या वर्षभरात भारतीय नौदलाचा हिंदी महासागर क्षेत्रातील दबदबा आणखी वाढणार आहे. कारण भारताच्या ताफ्यात P-8I या बहुउपयोगी विमानांचा समावेश होणार आहे. अमेरिकन बनावटीची आणखी चार विशेष विमाने पुढच्यावर्षीपर्यंत नौदलाला मिळणार आहेत. P-8I या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची, टेहळणीची आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची क्षमता आहे.

बोईंगकडून अशी आणखी सहा विमाने घेण्याचा भारताकडे पर्याय आहे. यासंबंधी २०२१ वाटाघाटी सुरु होऊ शकतात. या घडामोडींशी संबंधित असलेल्या नवी दिल्ली आणि सिएटलमधील सूत्रांनी ही माहिती दिली. भारतीय नौदलाकडे P-8A पोसी़डॉन विमान असून P-8I मधला I खास भारतासाठी आहे. समुद्री गस्त घालण्याबरोबरच पाणबुडीवर अचूक प्रहार करण्यासाठी सुद्धा हे विमान सक्षम आहे. हारपून ब्लॉक २ मिसाइल आणि हलक्या टॉरपीडोस सुद्धा या विमानामध्ये आहेत. पाणबुडी बरोबर जहाजविरोधी क्षेपणास्त्र सुद्धा या विमानावरुन डागता येऊ शकते. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- युद्धात गेम चेंजर ठरणाऱ्या राफेल फायटर विमानांचे २९ जुलैला भारतात लँडिंग?

टेहळणी, शत्रू प्रदेशाची माहिती गोळा करण्याबरोबरच शत्रुच्या पाणबुडया, जहाजांना जलसमाधी देण्याच्या विविध रणनितीक दृष्टीने बोईंगने या विमानांची निर्मिती केली आहे. समुद्राशिवाय अन्यत्र सुद्धा या विमानाचा वापर करता येऊ शकतो. २०१७ डोकलाम संघर्षाच्यावेळी आणि आता पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सुद्धा या विमानाचा वापर होत आहे.

२,२०० किमी या विमानाची रेंज असून प्रतितास ७८९ किमी या वेगाने हे विमान उड्डाण करु शकते. आणखी अशी सहा P-8I विमाने खरेदी करण्यासाठी अद्याप वाटाघाटी सुरु व्हायच्या आहेत, असं नवी दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. नोव्हेंबर २०१९ मध्येच संरक्षण खरेदी परिषदेने ही विमाने विकत घेण्यास मंजुरी दिली आहे. हिंदी महासागर क्षेत्रात चीनचा वावर वाढतोय. त्या दृष्टीने भारतीय नौदलासाठी ही विमाने अत्यावश्यक आहेत. म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान, इराण आणि पूर्व आफ्रिकी देशातील बंदरांवर सुद्धा चिनी युद्धनौका दिसत आहेत.