बांगलादेशात गुलशन भागातील एका स्पॅनिश कॅफेवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात २२ जण ठार झाल्याच्या प्रकरणाशी संबंधित जमातुल मुजाहिद्दीन बांगलादेश या देशी दहशतवादी संघटनेच्या चार संशयित महिला दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले, की या दहशतवादी संघटनेच्या अड्डय़ावर छापा टाकून चार महिलांना पकडण्यात आले. वायव्य सिराजगंज जिल्हय़ात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बॉम्बनिर्मिती साहित्य, सहा देशी बॉम्ब व जिहादी पुस्तके तेथून जप्त केली आहेत. १ जुलैला होली आर्टिसन बेकरी येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. प्रोटोम अलो या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार एका महिलेला आधीच अटक करण्यात आली होती ती हल्लेखोरांपैकी एक असावी असा संशय आहे. गुन्हेविरोधी कृती पथकाने हल्ल्यानंतरची दृश्यफीत बघितली तेव्हा चार संशयित अतिरेक्यांबरोबर एक महिलाही त्यात दिसत होती. तिचा त्या हल्ल्याशी संबंध होता. त्या हल्ल्यात १७ परदेशी नागरिकांसह २२ जण मारले गेले होते. हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतली असली तरी बांगलादेशने मात्र देशी दहशतवादी गटांनी हल्ला केल्याचे म्हटले होते. सीसीटीव्ही चित्रणात चार जण दिसत असून, त्यांच्यासमवेत एक महिलाही स्पॅनिश कॅफेच्या आवारात घुटमळत होती व तिच्याकडे व्हॅनिटी बॅग होती. बांगलादेशात या हल्ल्यानंतरही ६ जुलैला पुन्हा ईदच्या मेळाव्यात हल्ला झाला होता.