काश्मीरमधील लहानग्याची अनोखी कहाणी
श्रीनगरमधील गंदेरबल तुरुंगात इफ्तिखार अहमद हा चार वर्षांचा पाकिस्तानी मुलगा त्याच्या वडिलांना बिलगून त्यांना सोडण्यास तयार नाही. इफ्तिखारचे वडील गुलजार अहमद तांत्री (४३) यांनी १९९०ला गंदेरबल जिल्ह्य़ातील सालुरा गावातून कथित शस्त्रास्त्राच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पलायन केले.
गुलजार आपल्या मुलासह मंगळवारी पुन्हा गावी आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यानंतर पाकिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते अन्सार बुर्नी यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाशी ट्वीटरद्वारे संपर्क साधून इफ्तिखारला तरुंगातून मुक्त करण्यात यावी अशी विनंती केली. ‘मुलगा कुठेही जाण्यास स्वतंत्र आहे, पण तोच आपल्या वडिलांना सोडू इच्छित नाही’, मुलाचे वडिल पाकिस्तानातून परतल्याने आम्ही योग्य त्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई केल्याचे गंदेरबलचे पोलीस अधीक्षक इम्तियाझ इस्माईल पर्रे यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
गुलझार यांच्यावर कलम १३ बेकायदेशीर कृती कायदा आणि अन्य कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आम्ही चार वर्षांच्या मुलाला अटकच कशी करु शकतो? त्याला कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य आहे, असे ठाणेदार असीफ इक्बाल यांनी सांगितले. गुलजारचे कुटुंबियदेखील मुलाचा सांभाळ करण्यास तयार आहेत. पण हे सगळ व्यर्थ.. कारण त्याने कुटुंबियांना पहिल्यांदाच पाहिले असून तो त्याच्या वडिलांना सोडून जाण्यास नकार देत असल्याचे गुलझार यांचे भाऊ जुबैर अहमद तांत्री यांनी सांगितले.गुलजार ११ वीत असताना शस्त्रास्त्राच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात जाऊन मुझफ्फराबादमध्ये स्थायीक झाला. तिथे त्याची दोन लग्न झाली होती. पहिल्या पत्नीला मुल होत नसल्याने त्याने दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पत्नी पासून मुलगा झाला.पण कालांतराने त्या पत्नीचादेखील मृत्यू झाला.