एका चार वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या सर्तकतेमुळे हत्येचा गुन्हा उघड झाला आहे. नोएडा सेक्टर ९३ येथे रहाणारे संतोष राघव शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास घराच्या गच्चीवर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. संतोषची पत्नी ममता कामावरुन घरी परतल्यानंतर तिने सर्वप्रथम हे दृश्य पाहिले. सुरुवातीला संतोषने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले असे कुटुंबियांना वाटले.

कुटुंबिय संतोषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचा मृतदेह बुलंदशहरला घेऊन जात असताना वाटेत मुलीने सर्व घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर संतोषने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचे समोर आले. अंत्यसंस्कारासाठी रविवारी सकाळी आम्ही बुलंद शहराच्या दिशेने चाललो होते. मी मृतदेह ठेवलेल्या पहिल्या गाडीमध्ये बसले होते.

दोन्ही मुले दुसऱ्या गाडीत आईसोबत बसली होती. त्यावेळी मुलीने आईला शनिवारी संध्याकाळी दोन जण आपल्या घरी आले होते असे सांगितले. दोघांनी संतोषला दारु प्यायला लावली व मारहाण केली. त्यातल्या एकाने संतोषला गच्चीवर नेऊन लटकवले असे मुलीने सांगितले. समोर घडत असलेली घटना पाहून घाबरलेली मुलगी लपून राहिली. तिथेच तिला झोप लागली.

जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा आम्ही बुलंदशहरच्या दिशेने जात होतो. तिने जेव्हा वडिलांबद्दल विचारले तेव्हा ममताने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने घरात घडलेला हा प्रकार सांगितला. संतोषची काकी सीमा राणा यांनी ही माहिती दिली. संतोषच्या मृत्यूच्या काही वेळ आधी शेजाऱ्यांनी सुद्धा दोन जणांना त्याच्या घरात प्रवेश करताना पाहिले होते.

शेजाऱ्यांनी ही माहिती नोएडा पोलिसांना दिली. त्यानंतर नोएडा पोलिसांनी बुलंदशहर पोलिसांशी संपर्क साधून अंत्यसंस्कार रोखण्यास सांगितले. नोएडा पोलिसांनी संतोषचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. संतोष आणि ममता मुळचे बुलंदशहरचे असून ते नोएडा येथे भाडयाच्या घरात रहात होते. संतोष इलेक्ट्रीशियन होता. त्यांना दोन मुले आहेत. सात वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते.