भारताची स्थिती इतर देशांपेक्षा वेगळी असून येथे व्याजदर कपात करताना चलनवाढीचाही विचार करावा लागतो. असे असले तरी आपण समावेशक दृष्टिकोन ठेवून व्याजदर कपात टप्प्याटप्प्याने करीत आहोत. व्याजदर कपात करण्याचे काम अजून संपलेले नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले. एकप्रकारे त्यांनी चौथ्यांदा व्याजदर कपात करणार असल्याचे सूतोवाच केले आहे. जगात सध्या सगळीकडेच अर्थव्यवस्थांची गती मंदावली आहे व तीच खरी समस्या आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
कन्सास सिटी फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेच्या जॅकलन होल चर्चासत्रानंतर सीएनबीसी वाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले, की व्याजदर कपातीसाठी एक पतधोरण समिती नेमली जाणार असून त्यातील सदस्यांची नावे जाहीर केली जातील. रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदरात कपात करावी यासाठी सरकार व उद्योग क्षेत्राकडून सतत दडपण येत आहे. रिझव्‍‌र्ह बँक असूनही समावेशक दृष्टिकोन ठेवून आहे. स्थूल आर्थिक घटक व चलनवाढीचे आकडे बघून आम्ही व्याजदर कपात करायची की नाही ते ठरवत आहोत. आमच्याकडे चलनवाढीची समस्या आहे जी दुसरीकडे नाही. आम्ही वर्षांत तीनदा व्याजदर कमी केले आहेत. आकडेवारी बघूनच आम्ही व्याजदर कपात करतो. व्याजदर कपातीचे उद्दिष्ट संपलेले नाही. आणखी आकडेवारी उपलब्ध झाल्यावर व्याजदर कपातीचा निर्णय घेतला जाईल. ज्या संस्थेच्या परिसंवादात राजन यांनी २००७-२००८ या वर्षांत जागतिक आर्थिक पेचप्रसंगाचे भाकीत केले होते, त्याच ठिकाणी आज राजन यांचे भाषण झाले. राजन हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ होते.चीनबाबत राजन यांनी सांगितले, की भारत व चीन यांच्यात मोठी व्यापार भागीदारी आहे, पण अजून चीनमधील आर्थिक पडझडीचा भारतात इतर देशांइतका परिणाम झालेला नाही. चीनची आर्थिक स्थिती अपेक्षेपेक्षा जास्तच खालावली आहे, पण त्याचा आमच्यावर इतर देशांप्रमाणे परिणाम झालेला नाही. जागतिक अर्थव्यवस्था संकटात असताना आता फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदर वाढवू नयेत असा सल्ला राजन यांनी दिला. जगात आर्थिक संकट असताना व ते अपेक्षितही असताना आपण फक्त काही प्रमाणात त्या संकटाची तीव्रता कमी करू शकतो किंवा ते लांबणीवर टाकू शकतो.