अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांच्या भेटीकडे जगभराचे लक्ष लागले असतानाच यासंदर्भातील वृत्त देत असताना एका वृत्तनिवेदिकेने दोन्ही नेत्यांचा उल्लेख ‘हुकूमशहा’ असा केल्याने तिला भर कार्यक्रमातच माफी मागावी लागली. ‘मी चुकून नेत्यांचा उल्लेख हुकूमशहा असा केला’, असे सांगत वृत्तनिवेदिकेने या वादावर पडदा टाकला.

आज (मंगळवारी) सिंगापूरमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची ऐतिहासिक भेट होणार असून या भेटीकडे जगभराचे लक्ष लागले आहे. या बैठकीमुळे कोरिया द्वीपकल्पातील अण्वस्त्र प्रसाराचा मुद्दा व शीतयुद्धाचा वारसा निकाली निघण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक भेटीबाबत जगभरातील वृत्तवाहिन्यांवर चर्चा सुरु आहे. फॉक्स न्यूजवर रविवारी ‘फॉक्स अँड फ्रेंड्स’ या कार्यक्रमादरम्यान वृत्तनिवेदिका अॅबी हंट्समन यांनी ट्रम्प यांचा उल्लेख हुकूमशहा म्हणून केला. डोनाल्ड ट्रम्प यांचे सिंगापूरमध्ये आगमन होत असताना त्या म्हणाल्या, या दोन हुकूमशहांमधील भेटीत नेमके काय होईल हे माहित नाही. पण तुर्तास आपण जे बघतोय ते ऐतिहासिकच आहे, असे त्यांनी म्हटले.

यानंतर अॅबी यांच्यावर सोशल मीडियावर टीका सुरु झाली. अनेकांनी अॅबी यांच्या विधानावर आक्षेप घेतला. हा प्रकार लक्षात येताच अॅबी यांनी काही वेळाने कार्य़क्रमादरम्यान त्या विधानावर माफी मागितली. ‘लाइव्ह कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात तुम्ही कधी कधी चुकीचे विधान करता. मी ट्रम्प आणि किम जाँग यांना हुकूमशहा बोलून गेले. पण मला खरंच तसं म्हणायचं नव्हते. ही माझी चुक असून या विधानासाठी मी दिलगिरी व्यक्त करते’, असे अॅबी यांनी सांगितले.

अॅबी यांनी माफी मागितल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जण त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. लाइव्ह कार्यक्रमात बोलणे हे खूप कठीण असते. तू खूप उत्तम निवेदिका आहे. चुका प्रत्येकाकडून होतात आणि शेवटी आपण माणूस आहोत’, असे सांगत एका युजरने अॅबी यांना पाठिंबा दिला.

हा वाद थांबत नसल्याने अॅबी यांनी ट्विटरवरुनही माफी मागितली. मी शोदरम्यान माफी मागितली आहे. चुका होत असतात आणि माझ्याकडून अनेक चुका होतात. आता हे सर्व विसरुन आपण पुढे जायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.