भ्रष्टाचाराचे आरोप असलेले राज्याचे अर्थमंत्री के. एम. मणी यांनी अर्थसंकल्प मांडू नये, अशी मागणी करून केरळ विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शुक्रवारी अभूतपूर्व गोंधळ घातला. आमदारांनी खुच्र्याची मोडतोड केली, माइक फेकून मारले आणि टेबलांवर उभे राहून अक्षरश: धिंगाणा घातला. डावी लोकशाही आघाडी आणि संयुक्त लोकशाही आघाडी यांच्या आमदारांमध्ये झालेल्या हाणामारीत नऊ आमदार जखमी झाले.
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीच्या आमदारांनी सुरक्षारक्षकांशी झटापट करीत अध्यक्षांची खुर्ची सभागृहाच्या हौद्यात फेकून दिली. या गोंधळात एक आमदार सभागृहातच बेशुद्ध झाला, तर अनेक सुरक्षारक्षकांना किरकोळ जखमा झाल्या. या गोंधळात आपली छेडछाड करण्यात आल्याचा आरोप माकपच्या एका महिला आमदाराने केला.
‘हा राज्यासाठी काळा दिवस होता,’ अशी प्रतिक्रिया या प्रकारामुळे अस्वस्थ झालेले मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी दिली.दारूच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी बारमालकांकडून लाच घेतल्याच्या आरोपासाठी दक्षता विभाग आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग यांनी गेल्या वर्षी अर्थमंत्री के. एम. मणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी सदस्य अनेक दिवसांपासून करीत आहेत.
मणी यांना भाषण देण्यापासून रोखण्याचे विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मणी व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी गुरुवारी रात्री नाटय़मयरीत्या स्वत:ला विधानसभा सभागृहात कोंडून घेतले होते. अध्यक्षांच्या मंजुरीशिवाय आणि त्यांच्या अनुपस्थितीत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प वैध नाही, असा दावा माकपचे नेते पिनाराय विजयन यांनी केला.
आमदार आणि कार्यकर्ते यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ  डाव्या लोकशाही आघाडीने शनिवारी राज्यव्यापी ‘बंद’ पुकारला आहे.
केरळ विधानसभेतील गोंधळाचे पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहातही उमटले. काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमकी झडल्या.