सिगारेट लायटरमुळे फ्रान्समध्ये भारतीय नागरिकाच्या हत्येच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. सिगारेट लायटरच्या आधारे पोलिसांना मृत व्यक्तीचे घर सापडले आणि घरातील टुथब्रशवरील डीएनए नमुन्यावरुन भारतीय नागरिकाची ओळख पटली आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मशिन ऑपरेटरला उत्तर फ्रान्समध्ये साफसफाई करताना ढिगाऱ्यात एक बॅग सापडली होती. या बॅगमध्ये मृतदेह होता. मात्र, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण होते. बोटांच्या ठशांवरुनही ओळख पटवणे कठीण झाले होते. मृत व्यक्तीच्या खिशात एक सिगारेट लायटर होता. या आधारे फ्रान्स पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र, मृत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने युरोपमधील अन्य यंत्रणांना माहिती देण्यात आली.  बेल्जियम पोलिसांनी मृतदेहाजवळील लायटरचे छायाचित्र पाहून फ्रान्स पोलिसांशी संपर्क साधला.

लायटरवरील शब्दांचा अर्थ ‘द पब” असा होता. बेल्जियममध्ये हे नाव प्रसिद्ध असून संबंधित रेस्टॉरंट मृत व्यक्तीच्या घराजवळच होते.  बेल्जियम सीमेवर त्याचे घर होते. पोलीस या लायटरच्या आधारे मृत व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचले. यानंतर घरातील टुथब्रशवरील डीएनएचे नमुने आणि मृत व्यक्तीचे डीएनए नमुने याची तपासणी करण्यात आली. अखेर हा मृतदेह भारतीय नागरिक दर्शन सिंह (वय ४२) याचा असल्याचे समोर आले.  या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. हत्येचे नेमके कारण काय होते, याचा तपशील पोलिसांनी दिलेला नाही.