दहशतवाद्यांचे ड्रोन नष्ट करण्यासाठी फ्रान्सने गरुडांना प्रशिक्षण दिले आहे. गेल्या वर्षभरात फ्रान्सच्या लष्कराने प्रशिक्षित केलेल्या चार गरुडांच्या पथकाने दहशतवाद्यांचे ड्रोन नष्ट केले आहेत. अर्टाग्नन, अथोस, पोर्थोस आणि अरामीस या चार गरुडांनी मागील उन्हाळ्यात दहशतवाद्यांची ड्रोन नष्ट केली आहेत. दहशतवाद्यांची ड्रोन्स उद्ध्वस्त करुन कामगिरी यशस्वी केल्यावर प्रशिक्षित गरुडांना त्यांनी आकाशातून जमिनीवर पाडलेल्या ड्रोन्सवरच मांस दिले जाते. गरुडांची सेना ड्रोनवर मिळालेल्या मांसावर यथेच्छ ताव मारते.

प्रशिक्षण दिलेले गरुडांचे पथक जेव्हा आकाशात झेपावते, तेव्हा फ्रान्सच्या लष्कराकडून संपूर्ण मोहिमेवर नियंत्रण मनोऱ्यातून लक्ष ठेवण्यात येते, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली आहे. प्रशिक्षित करण्यात आलेले गरुडांचे पथक २० सेकंदांमध्ये २०० मीटर अंतर कापते. यानंतर आकाशात उंच भरारी घेत ड्रोनवर झडप मारुन दहशतवाद्यांचे इरादे धुळीस मिळवतात. ‘गरुडांची प्रगती योग्य दिशेने सुरू आहे,’ असे फ्रान्स हवाई दलाच्या कमांडरने सांगितले आहे. फ्रान्सच्या हवाई दलाकडून गरुडांच्या सर्व मोहिमांवर बारिक लक्ष ठेवले जाते.

आठवड्याभरापूर्वी इराणच्या सैन्याने आकाशात जोरदार गोळीबार केला होता. ड्रोनच्या मदतीने आकाशातून बॉम्ब टाकला गेल्यानंतर इराणच्या सैन्याकडून आकाशात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. दहशतवाद्यांकडून सध्या विविध प्रकारची शस्त्रास्त्रे विकसित केली जात आहेत. यामध्ये लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानात उपलब्ध होऊ शकतील, अशा शस्त्रास्त्रांवर दहशतवाद्यांकडून काम सुरू आहे. यासोबतच रेडिओच्या माध्यमातून शत्रूवर नजर ठेवता येईल, अशी यंत्रणादेखील दहशतवाद्यांकडून निर्माण केली जाते आहे, असे वृत्त असोशिएट प्रेस या वृत्तसंस्थेने दिले आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष राहात असलेल्या निवासस्थानावर आणि लष्करी तळांवर २०१५ सालच्या सुरुवातीला ड्रोन उडताना आढळले होते. त्यावेळी कोणालाही इजा झाली नाही. मात्र यानंतर मागील वर्षी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर फ्रान्सच्या लष्कराने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आकाशात उडणारे ड्रोन टिपणे आणि त्यातही ते जास्त लोकसंख्या असलेल्या भागात टिपणे कठीण असते. त्यामुळे फ्रान्सच्या लष्कराने यासाठी गरुडांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.