मोहम्मद पैगंबराच्या कार्टूनवरून सुरू झालेल्या वादानं पुन्हा एकदा फ्रान्समध्ये रक्त सांडलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाची हत्या करण्यात आल्यानंतर गुरुवारी फ्रान्समधील नीस शहरात एका चर्चेमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांने तिघांचे प्राण घेतले. या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरुन सुरु झालेल्या वादातून फ्रान्समधील एका चर्चमध्ये हल्लेखोरानं चाकू हल्ला केला. यामध्ये एका महिलेसह तिघांची हत्या करण्यात आली आहे. ज्या हल्लेखोराने हत्या केली त्याने आधी अल्ला हू अकबरचे नारे दिल्याचं फ्रान्समधील काही माध्यमांनी म्हटलं आहे. फ्रान्समधील नीस शहरात असलेल्या चर्चमध्ये ही घटना घडली. नीस शहराचे महापौर ख्रिश्चियन एस्ट्रोसी यांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचा दावा केलेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला. “आज नीसमधील चर्चमध्ये झालेल्या भयंकर हल्ल्यासह फ्रान्समध्ये अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मी निषेध करतो. आमच्या सहवेदना हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या व फ्रान्समधील नागरिकांबरोबर आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत फ्रान्ससोबत उभा आहे आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच प्रेषित महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रं दाखवून त्याविषयावर चर्चा घडविल्यामुळे पॅरिसमध्ये एका इतिहासाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. ज्याने ही हत्या केली, तो १८ वर्षीय चेनेन नावाचा संशयित आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला होता.