फ्रान्सने सीरियावर चार्लस द गॉल या विमानवाहू युद्धनौकेवरून जेट विमाने सोडून हल्ले केले. पूर्व भूमध्य समुद्रात ही युद्धनौका तैनात करण्यात आल्यानंतर हवाई दलाच्या मिराज २००० विमानांनी धडक कारवाई केली. त्याच्या जोडीला चार राफाल विमानांनी सीरियात हल्ले केले. जेट विमानांनी उत्तरेकडील रक्का या जिहादी गटांच्या बालेकिल्ल्यावर हल्ले चढवले. फ्रान्सने काल इराकमध्येही आयसिसवर हल्ले केले. सीरियात दहशतवाद्यांचे रक्का येथील अड्डे नष्ट करण्यात आले. कमांड सेंटर, वाहन भांडारे व निगा सुविधा केंद्रे नष्ट करण्यात आली. पॅरिस येथील हल्ल्यात १३० जण ठार झाले होते व त्याची जबाबदारी आयसिसने घेतल्यानंतर दहा दिवसात फ्रान्सने हे समन्वित हल्ले केले आहेत. फ्रान्सने आयसिसविरोधी लढा तीव्र केला असून जॉर्डन व संयुक्त अरब अमिरातीतील तळांवरून हे हल्ले करण्यात आले. चार्लस द गॉल या विमानवाहू युद्धनौकेवरून फ्रान्सने हल्ले केल्याने आता मारक क्षमता वाढली आहे.
पॅरिस येथे रस्ते साफ करणाऱ्या व्यक्तीस पॅरिस हल्ल्यात सापडला होता तसाच स्फोटके असलेला झगा सापडला असून एका संशयिताचा मोबाईल फोनही सापडला आहे, ज्याचा तो मोबाईल असावा तो हल्ला अर्धवट सोडून पळाला असावा किंवा त्याचा आत्मघाती झगा निकामी झाला असावा त्यामुळे तो भीतीने पळाला असावा.
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी त्यांच्या देशात सतर्कता आदेश दिले आहेत ते योग्यच असल्याचा दावा यामुळे करण्यात आला आहे.
पॅरिसच्या दक्षिणेकडे चॅटिलन-मोट्रोज येथे हा डिटोनेटर नसलेला झगा सापडला.