फ्रान्स विमानतळ हल्ल्यातील मृताच्या वडिलांचा दावा

माझा मुलगा दहशतवादी नव्हता, असा दावा शनिवारी फ्रान्समधील विमानतळावर मारला गेलेल्या झाएद बिन बेल्गासेम याच्या वडिलांनी केला आहे.

झाएद बिन बेल्गासेम याने शनिवारी पॅरिसमधील ऑर्ली विमानतळावर एका महिला सैनिकाच्या हातातातील बंदूक हिसकावून घेऊन तिच्या डोक्यावर रोखली होती. मला अल्लासाठी मरायचे आहे आणि इतरांनाही मारायचे आहे, असे झाएद ओरडला होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चकमकीत ठार मारले होते. चकमकीत एक अधिकारी किरकोळ जखमी झाला होता. या घटनेमुळे विमानतळावरून सुमारे ३०० प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते व वाहतूक विस्कळीत झाली होती.

घटनेनंतर झाएद बिन बेल्गासेम यांची पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले. त्यानंतर फ्रान्समधील ‘युरोप १’ या रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झाएदच्या वडिलांनी आपला मुलगा दहशतवादी नव्हता असा दावा केला. माझा मुलगा कधीही प्रार्थना करत नसे. मात्र तो दारू पित असे. दारू किंवा अफूच्या नशेत त्याच्याकडून हे कृत्य घडले असावे. तो दहशतवादी नव्हता, असे त्याच्या वडिलांनी रेडिओ वाहिनीला सांगितले. या घटनेपूर्वी झाएदने वडिलांना दूरध्वनी करून माफीही मागितली होती.

झाएदवर यापूर्वीही सशस्त्र दरोडा, पोलिसांवर गोळीबार करणे, वाहनचोरी अशा गुन्ह्य़ांचे आरोप होते. पोलिसांनी झाएदच्या भावंडांचीही कसून चौकशी केली.