पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आता फ्रान्सने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. २०४० पर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारची विक्री बंद करण्याचा मानस फ्रान्समधील पर्यावरण मंत्री निकोलस हुलॉट यांनी व्यक्त केला आहे.

गुरुवारी फ्रान्सचे पर्यावरण मंत्री निकोलस हुलॉट यांनी पत्रकार परिषदेत पर्यावरण आराखडा सादर केला. २०४० पर्यंत पेट्रोल आणि डिझेल कारची विक्री बंदी करु असे त्यांनी सांगितले. २०४० नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या कारवर बंदी घालण्यात येणार का आणि नेमकी याची अंमलबजावणी कशी होणार याविषयी त्यांनी सविस्तर भाष्य केले नाही. हायब्रिड कारवरही बंदी टाकणार का यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. पण फ्रान्समधील कार उत्पादक कंपन्यांवर कराचा बोजा वाढवला जाईल असे संकेत त्यांनी दिले आहेत. व्हॉल्वोने २०१९ पासून इंटर्नल कम्बशन इंजिन असलेल्या गाड्यांची निर्मिती करणार नाही अशी घोषणा केली होती. गेल्या काही महिन्यांपासून कार उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रीक आणि हायब्रिड कारच्या निर्मितीवर भर दिला आहे. जागतिक बाजारपेठेत इलेक्ट्रीक कारचे प्रमाण फक्त १ टक्के आहे. पण एका संस्थेच्या अंदाजानुसार २०२७ पर्यंत जगभरातील इलेक्ट्रीक कारचे प्रमाण ७० लाख असेल.

पेट्रोल आणि डिझेल कार बंद करण्याचा निर्णय अवघड आहे. पण फ्रान्समधील कार कंपन्यांनी आता बदल स्वीकारलाच पाहिजे असे त्यांनी सांगितले.  युरोपमधील अन्य देशांनीही पेट्रोल- डिझेल कारमुळे होणाऱ्या प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी इलेक्ट्रीक आणि हायब्रिड गाड्यांना प्राधान्य देण्याचे धोरण आखले आहे. जर्मनीने २०२० पर्यंत १० लाख इलेक्ट्रीक कार रस्त्यावर उतरवण्याचा निर्धार केला आहे.