पुलवामा हल्ल्यास जबाबदार असलेल्या जैश ए महम्मद या संघटनेचा म्होरक्या दहशतवादी मसूद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अपयश आले असले तरी फ्रान्सने त्याच्या आर्थिक नाडय़ा आवळण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

फ्रान्सने मसूदवर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. फ्रान्समधील मसूद अझरच्या मालमत्ता आणि बँकखाती जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करावे, यासाठी फ्रान्सने पुढाकार घेतला होता. फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनने मसूदविरोधातला ठराव आणला होता. चीनने नकाराधिकार वापरून तो रोखला. मात्र आता फ्रान्सने आर्थिक र्निबधांचा मार्ग अमलात आणल्याने अमेरिका आणि ब्रिटननेही जर मसूदवर आर्थिक निर्बंध आणले, तर दहशतवादी गटाला हादरा बसण्याची शक्यता आहे. दहशतवादविरोधातील लढाईत फ्रान्स नेहमीच भारताच्या बाजूने असल्याचा पुनरूच्चारही फ्रान्सने शुक्रवारी केला आहे.

दरम्यान, मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करावे ही मागणी भारताच्या वतीने २००९मध्ये पहिल्यांदा करण्यात आली होती. त्यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत होते. त्यावेळी भारत मुत्सद्दी पातळीवर एकटा पडला होता.