पॅरिस : काश्मीर हा भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय  प्रश्न आहे, त्यामुळे यावरील मतभेद राजकीय संवादातून दूर करावेत तसेच तणाव निर्माण करणारी पावले उचलू नयेत, असा सल्ला फ्रान्सने पाकिस्तानला दिला आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी त्यांचे समपदस्थ जीन वेस ल ड्रियान यांना दूरध्वनी केला असता फ्रान्सने चार शब्द सुनावण्यास कमी केले नाही.

ड्रियान यांनी फ्रान्सची काश्मीर प्रश्नावरील जुनीच भूमिका मांडताना तो द्विपक्षीय प्रश्न असल्याचे मान्य करून संवादातून हा प्रश्न सोडवण्याचा सल्ला कुरेशी यांना दिला आहे.

फ्रान्सने भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांना संयम पाळण्याचे आवाहन केले असून तणाव निर्माण करणाऱ्या कृतीपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

भारताने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेताना कलम ३७० रद्द केल्याने दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता.  विशेष दर्जा काढून घेण्याचा मुद्दा हा भारताची अंतर्गत बाब आहे, असे सांगून फ्रान्सने पाकिस्तानला  वास्तव मान्य करण्याचा सल्ला दिला आहे.

फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा सोयीचा तपशील देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, फ्रान्स हा  संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य देश असून तो शांतता व स्थिरतेसाठी प्रयत्न करणार आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळातील बंद दाराआड बैठकीत फ्रान्सने पाकिस्तानला पाठिंबा दिला नसल्याच्या बातम्या आल्यानंतर कुरेशी यांनी त्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांना दूरध्वनी केला होता.