आयसिसच्या दहशतवाद्यांनी पॅरिसमध्ये केलेल्या भीषण हल्ल्यांना फ्रान्सने रविवारी प्रत्युत्तर दिले. फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी सिरियातील आयसिसच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. उत्तर सिरियातील आयसिस दहशतवाद्यांची कथित राजधानी असलेल्या रक्कामध्ये रविवारी फ्रान्सच्या लढाई विमानांनी हल्ले चढवले. फ्रान्स सरकारनेच एका निवेदनाद्वारे याबद्दल माहिती दिली.
आयसिसच्या सात दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री पॅरिसमध्ये रेस्टॉरंट, कॉन्सर्ट हॉल, नॅशनल स्टेडियम या सर्व ठिकाणी केलेल्या गोळीबार आणि बॉम्बस्फोटात १२९ जणांचा बळी गेला होता. या हल्ल्यांनंतर आयसिसने त्याची जबाबदारी स्वीकारली होती. फ्रान्समधील गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी केलेल्या तपासातही या हल्ल्यासाठी आयसिसने सर्व तयारी केली होती. त्यांनीच दहशतवाद्यांना हल्ल्यासाठी तयार करून त्यांना शस्त्रसाठा पुरविला असल्याचे उघड झाले. त्यानंतर रविवारी लगेचच फ्रान्सकडून सिरियातील आयसिसच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये आयसिसचे किती दहशतवादी मारले गेले, याची माहिती अद्याप उघड झालेली नाही.
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची तुलना देशाबरोबर युद्ध पुकारण्याशी केली होती. त्यामुळे फ्रान्समध्ये युद्धपातळीवर हल्लेखोरांना कोणी कोणी मदत केली याचा शोध घेण्यात येतो आहे. याप्रकरणी एक अज्ञात कारही रविवारी जप्त करण्यात आली.