15 December 2017

News Flash

पॅरिसमध्ये पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न, संशयित हल्लेखोराचा खात्मा

दहशतवादी हल्ल्याचा संशय

पॅरिस | Updated: June 19, 2017 9:10 PM

शाँज एलिजे परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पुन्हा एकदा पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनेने सोमवारी खळबळ माजली. शाँज एलिजे या प्रसिद्ध रस्त्यावर संशयित हल्लेखोराने वेगात गाडी नेऊन पोलिसांच्या गाडीला धडक दिली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी पोलिसांच्या कारवाईत संशयित हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. पॅरिसमधील दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

शाँज एलिजे या प्रसिद्ध रस्त्यावर पॅरिस पोलिसांची एक कार उभी होती. संशयित हल्लेखोराने त्याची कार वेगात नेऊन पोलिसांच्या गाडीला धडक दिली. गाडीची धडक बसल्यानंतर किरकोळ स्फोटाचा आवाज आला. संशयित हल्लेखोराकडे शस्त्र असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित हल्लेखोराचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. शाँज एलिजे परिसर पर्यटकांमध्येही प्रसिद्ध आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा परिसर रिकामा केला असून दहशतवादविरोधी पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. ‘संशयिताने जाणूनबुजून पोलिसांच्या गाडीला धडक दिली’ असे फ्रान्समधील गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. हा दहशतवादी हल्ला होता का याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिकांनी आणि पर्यटकांनी शाँज एलिजे येथून प्रवास करणे टाळावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शाँज एलिजे येथे एप्रिलमध्येही दहशतवाद्याने पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. बंदुकधारी हल्लेखोराला पोलिसांनी कंठस्नान घातले होते. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

First Published on June 19, 2017 9:10 pm

Web Title: france suspected attacker rams police van with car in paris attacker downed by police champs elysees terror