फ्रान्सवर करण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर चार महिन्यांनी पॅरिसमधील एका प्रेक्षागृहावर हल्ला करण्याची योजना आखल्याचा आरोप दोघा अल्पवयीन मुलींवर ठेवण्यात आला आहे.

सदर मुली १५ आणि १७ वर्षांच्या असून त्यांनी फेसबुकवरून संदेश दिला आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात बॅटक्लान प्रेक्षागृहात भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला होता, त्याप्रमाणे आपल्याला हल्ला करावयाचा असल्याचा दावा या मुलींनी केला आहे. इतकेच नव्हे तर बार, रेस्टॉरण्ट आणि फुटबॉल स्टेडियमवरही हल्ला करावयाचा असल्याचे या मुलींनी म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या मुलींनी बुधवारी अटक करण्यात आली आणि दहशतवादविरोधी न्यायालयाच्या न्यायमूर्तीसमोर हजर करण्यात आले. दहशतवादी गटासमवेत फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सदर मुलींनी हल्ला करण्याचे फेसबुकवरील संदेशात म्हटले असून, त्यामध्ये सहभागी होणाऱ्या अन्य दोन जणींची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.या हल्ल्याच्या कटाबाबत केवळ प्राथमिक चर्चा झाली आहे, शस्त्रे अथवा स्फोटके मिळालेली नाहीत, असे पॅरिसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. फ्रान्समध्ये १३ नोव्हेंबर २०१५ रोजी भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर अत्यंत सावधानता बाळगण्यात येत आहे.