पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी कंबर कसली असून, फ्रान्स सरकारने उचललेलं पाऊल म्हणजे भारतासाठी मोठे यश मानले जात आहे. भारताच्या कुटनितीला यश मिळाले आहे. भारतातील अनेक हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव फ्रान्स सरकार संयुक्त राष्ट्र संघात मांडणार आहे. फ्रान्स सरकारच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. आगामी दोन ते तीन दिवसात फ्रान्स सरकार हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात आणणार आहे.

मसूद अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवण्याची संयुक्त राष्ट्र संघात ही दुसरी वेळ आहे. याआधी अमेरिकेने २०१७ मध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अमेरिकेच्या या प्रस्तावाला ब्रिटनने पाठिंबा दिला होता. मात्र, चीनच्या खोड्यामुळे संयुक्त राष्ट्र संघामध्ये तो प्रस्ताव पारित होऊ शकला नाही. आता पुन्हा एकदा तसाच प्रस्ताव ठेवला जाणार आहे.

फ्रान्सचे राष्ट्रपती आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यात चर्चा याबाबत दिर्घ चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. डोवल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर फ्रान्सने हा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला दहशतवाद्यांच्या यादीत सामील करण्याची मागणी फ्रान्सकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्लात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीयामध्ये संतापाची लाट पसरली आहे. मोदी यांनी जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे.