भारताने पाकस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-महंम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ल्याला फ्रान्सकडूनही पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. दहशतवाद खपवून घेतला जाता कामा नये. तसेच ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत फ्रान्स सरकार प्रस्ताव पाठवणार आहे, असे भारत दौऱ्यावर असलेले फ्रेन्च राजदूत अलेक्झांडर झिग्लर यांनी म्हटले आहे.


झिग्लर म्हणाले, सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाविरोधात भारताने केलेल्या कायदेशीर कारवाईला आमचा पाठींबा आहे. तसेच भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. कारण, त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होण्यास मदत झाली.

संयुक्त राष्ट्रांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून आम्ही मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय घोषित करण्यात यावे यासाठी प्रस्ताव देत आहोत. मात्र, त्यावर अद्याप कारवाई होत नाही हे काही कळत नाही, असे झिग्लर यांनी म्हटले आहे. तसेच फ्रान्स भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमचे सदस्यत्व मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे. सुधारणांसाठी सुरक्षा परिषदेची मर्यादा वाढवावी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सुधारणांसाठी ब्राझील, जर्मनी आणि जपान यांच्यासोबत भारतालाही बोलावण्यात आले आहे. सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत सक्षम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच अफ्रिकेलादेखील एकसारखी संधी मिळावी अशीही मागणी झिग्लर यांनी म्हटले आहे.