एफ. ए. इंटरप्राइझेसची नस्ती गहाळ; गुन्हा दाखल

कोकण पाटबंधारे महामंडळाअंतर्गत येणाऱ्या रायगड येथील बाळगंगा सिंचन घोटाळ्यातील कंत्राटदार एफ. ए. इंटरप्राइझेसला २५ कोटी वा त्यापेक्षा अधिक कंत्राटे मिळावीत यासाठी ‘वर्ग अ’ दर्जा दिल्याबाबतची नस्तीही गहाळ करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंता अनिलकुमार गायकवाड यांच्यासह एफ. ए. इंटरप्राइझेसच्या पाच संचालकांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकण पाटबंधारे महामंडळाअंतर्गत कोणत्याही कंत्राटदाराला तीनपेक्षा अधिक कामे न देण्याबाबत २००१ मध्ये परिपत्रक जारी करण्यात आले होते. तरीही एफ. ए. कन्स्ट्रक्शन या कंपनीची सहा कामे सुरू होती. आणखी कामे स्वीकारण्यासाठी फतेह मोहम्मद खत्री, निसार फतेह खत्री, जैतुन फतेह खत्री यांनी एफ. ए. इंटरप्राइझेस ही नवीन भागीदारी कंपनी स्थापन केली. या कंपनीस ‘वर्ग अ’ मिळाला तरच त्यांना इतर कंत्राटे मिळणार होती. त्यामुळे एफ. ए. कन्स्ट्रक्शनमधील हे तीनही भागीदार निवृत्त होणे आवश्यक होते. त्यामुळे २००६ मध्ये निवृत्त झाल्याबाबत आणि भागीदारी अस्तित्वात असल्याबाबतचा बनावट करारनामा तयार करून एफ. ए. कन्स्ट्रक्शन या कंपनीतील नऊ भागीदारांपैकी तिघांनी निवृत्त झाल्याची भागीदारी करारपत्रे तयार केली. मात्र त्याची नोंद केली नाही. ही कागदपत्रे बनावट असल्याचे माहिती असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अनिल गायकवाड यांच्याकडे सादर केली. त्यानंतर त्यांनी ‘वर्ग अ’ बहाल केला. एफ. ए. कन्स्ट्रक्शनच्या नावे असलेली यंत्रसामग्री एफ. ए. इंटरप्राइझेस यांच्या नावे न करताही ‘वर्ग अ’ प्राप्त केल्याप्रकरणी फतेह मोहम्मद खत्री, निसार फतेह खत्री. जैतुन खत्री, आबिद खत्री, जाहिद खत्री यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या पाच भागीदारांना २५ कोटींपेक्षा अधिक कामे मिळावीत यासाठी गुन्हेगारी कटात सहभागी झाल्याचा आरोप गायकवाड यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
चौकशी करणार
बाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी आता सक्तवसुली महासंचालनालय काळा पैसा प्रतिबंध कायद्यांतर्गत (पीएमएलए) चौकशी करणार असल्याचे महासंचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ९२.६३ कोटी रुपयांच्या या घोटाळ्याबाबत ही चौकशी होणार आहे.

सिंचन प्रकल्पातील कंत्राटदार कंपन्यांना ‘अ दर्जा’ देताना घोटाळा झाला आहे. याबाबतच्या नस्तीही गायब करण्यात आल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे
– प्रवीण दीक्षित, महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग