निवडणुकांच्या काळात मतांसाठी काही उमेदवार मतदारांना वेगवेगळे गिफ्ट्स देऊन खूश करताना आपण पाहिलं असेल पण चक्क लस घ्यावी म्हणून गिफ्ट्स..हे बहुधा पहिल्यांदाच घडत असावी. शहरातल्या लसीकरण मोहिमेचा वेग वाढावा यासाठी नागरिकांना अशा महागड्या गिफ्ट्सची आमिषं दाखवून लस घेण्यासाठी बोलवावं लागत आहे. चेन्नईच्या कोवलम भागातल्या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी एका सेवाभावी संस्थेने हे पाऊल उचललं आहे.

कोवलममध्ये एका सेवाभावी संस्थेच्या वतीने लस घेणाऱ्यांना एक प्लेट बिर्याणी आणि मोबाईच रिचार्जचं कूपन दिलं जात आहे. याशिवाय दर आठवड्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून नागरिकांना सोन्याची नाणी, मिक्सर, स्कूटी, वॉशिंग मशीन अशा महागड्या गोष्टीही जिंकता येत आहेत. अट फक्त एकच…लस घेतली पाहिजे. कोवलम या भागात बहुसंख्य कोळी लोक राहतात. या भागाची लोकसंख्या साधारण १४,३०० इतकी आहे. यामध्ये १८ वर्षांवरील वयोगटातले ६,४०० जण आहेत. या संस्थेचं म्हणणं आहे की अशा योजनांमुळे लस घेण्यासाठीची प्रेरणा मिळत आहे.

आणखी वाचा – समजून घ्या : केंद्र सरकारच्या नवीन नियमानंतर Covishield आणि Covaxin च्या एका डोसची किंमत किती असणार?

या गावातल्या लोकांमध्ये लसीकरणाबाबत प्रचंड भीती आहे. त्यामुळे या गावातलं लसीकरण संथ गतीने सुरु होतं. सुरुवातीच्या काळात लसीकरण केंद्रांवर केवळ ५०-६० जण उपस्थित असायचे. मात्र, या संस्थेने नव्या योजनेची सुरुवात केल्यानंतर मात्र लस घेण्यासाठी गर्दी उसळू लागली. एका आठवड्यातच ६५०हून अधिक लोकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ७०० हून अधिक जणांची नोंदणी झालेली आहे. लोकांनी सांगितलं की लसीकरणाबद्दल पूर्वी आमच्या मनात संभ्रम होता. पण या संस्थेने सगळे गैरसमज दूर केले आहेत. आता आम्ही सहपरिवार जाऊन लस घेत आहोत.

हेही वाचा – PM Modi announces free COVID-19 vaccines for all : सर्वाना मोफत लस!

कोवलम भागाला करोनामुक्त करण्यासाठी एसटीएस फाऊंडेशन, सीएन रामदास ट्रस्ट आणि संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. राजीव फर्नांडो यांनी स्थापन केलेल्या न्यूयॉर्कच्या चिराग या संस्थेने पुढाकार घेतला आहे.