JEE आणि NEET च्या परीक्षेसाठी असणाऱ्या खासगी क्लासेसची फी भरता भरता पालकांची दमछाक होते. पण आपल्या पाल्याला उच्चशिक्षित करण्यासाठी पालक जीवाचा आटापिटा करतात. या पालकांना आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उच्चशिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या JEE आणि NEET या परीक्षांसाठी सरकारकडून मोफत वर्ग चालविण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. २०१९ पासून हे क्लासेस सुरु होणार असून विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासासाठी त्याचा चांगला फायदा होणार आहे.
उच्च शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी सरकारने एका नॅशनल टेस्टींग एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्यामार्फत हे क्लासेस घेतले जाणार आहेत. सध्या या नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत प्रॅक्टीस सेंटर चालवले जातात. सध्या देशभरात २६९७ सेंटर कार्यरत असून हे सर्व सेंटर क्लासेसमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहेत. खासगी क्लासेसच्या दृष्टीने ही काहीशी धोक्याची गोष्ट असली तरीही विद्यार्थ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. तसेच खिशाला न परवडणाऱ्या क्लासच्या शुल्कापासून पालकांची सुटका होणार आहे. येत्या १ सप्टेंबर पासून या क्लासच्या नोंदणीला सुरुवात होणार असून ३० सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे.
मे २०१९ पासून क्लासेस सुरु होणार असून JEE Main च्या क्लासच्या प्रवेशासाठी मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मोबाईल अॅप्लिकेशन किंवा वेबसाईटच्या माध्यमातून हे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तर या मॉक टेस्टचा रिझल्ट लागल्यानंतर त्यानुसार क्लासला प्रवेश देण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही ते आपल्याकडून काय चुका झाल्या याबाबत सेंटरवरील शिक्षकांशी संवाद साधू शकतील. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 12:29 pm