24 October 2020

News Flash

मोफत धान्य नोव्हेंबरपर्यंत

पंतप्रधानांची घोषणा; ८० कोटी नागरिकांना लाभ

संग्रहित छायाचित्र

देशातील ८० कोटी गरिबांना आणखी पाच महिने म्हणजे नोव्हेंबपर्यंत मोफत धान्य पुरवले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. टाळेबंदी शिथिलीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मंगळवारी देशाला उद्देशून भाषण केले. करोनाचे संकट टळलेले नसल्याने कोणीही बेफिकीर राहू नये, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

सणासुदीचा काळ सुरू होत असून, जनतेच्या गरजा वाढतील आणि खर्चही वाढेल. ही बाब लक्षात घेऊन तीन महिन्यांपूर्वी सुरू केलेली मोफत धान्य योजना दिवाळीपर्यंत म्हणजे नोव्हेंबरअखेपर्यंत कायम राहील. गरिबांना आणखी पाच महिने या योजनेचा लाभ घेता येईल, असे मोदी म्हणाले. मोफत धान्य योजनेअंतर्गत रेशन दुकानांवर दरमहा प्रत्येक व्यक्तीला ५ किलो गहू किंवा तांदूळ तसेच, प्रत्येक कुटुंबाला १ किलो डाळ मोफत मिळेल. त्यासाठी ९० हजार कोटी खर्च होतील. पंतप्रधान गरीब कल्याण धान्य योजना तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. त्याचा खर्च एकत्र केला तर एकूण १.५ लाख कोटी खर्च होतील, अशी माहिती मोदी यांनी दिली.

टाळेबंदीच्या काळात केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत १.७५ लाख कोटींची मदत दिली. गेल्या तीन महिन्यांत ३० कोटी लोकांच्या जनधन खात्यात ३१ हजार कोटी जमा झाले. ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत १८ हजार कोटी जमा झाले. गावांमध्ये श्रमिकांना रोजगारासाठी केंद्र सरकार ५० हजार कोटी खर्च करत आहे. ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ही योजना पूर्णत्वास नेण्यात येत असून त्याचा बाहेरच्या राज्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना लाभ होणार आहे. गरिबांना सरकार मोफत अन्न देऊ  शकले, याचे श्रेय शेतकरी आणि इमानदार करदात्यांना जाते, असे मोदी म्हणाले.

चीनबद्दल बोलण्याचीही मोदींना भीती : काँग्रेस

पंतप्रधानांच्या भाषणाबाबत काँग्रेसने नापसंती व्यक्त केली. लडाखमधील घुसखोरीप्रकरणी चीनचा निषेध करणे दूरच; भाषणात चीनचा उल्लेख करण्याचीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भीती वाटते, अशी टीका काँग्रेसने ट्वीटद्वारे केली. सरकारी अधिसूचना काढता येऊ शकली असती त्या गोष्टीसाठी आणखी एकदा देशाला उद्देशून भाषण झाले, असा टोलाही काँग्रेसने लगावला.

‘बेफिकीर राहू नका’

टाळेबंदी शिथिल केली असली तरी बेफिकीर राहू नका. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंतरनियम पाळा, मुखपट्टीचा वापर करा. सरपंचापासून पंतप्रधानांपर्यंत कोणीही नियमांना अपवाद नाही, असे सांगत मोदींनी जनतेला स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले. जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारतातील करोनाची स्थिती बरी आहे. टाळेबंदी व अन्य निर्णय योग्य वेळी घेतल्याने हजारोंचे प्राण वाचले. मृत्यूदर कमी आहे. टाळेबंदीच्या काळात गंभीरपणे नियमांचे पालन करण्यात आले. पण, टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर बेपर्वाईची स्थिती दिसत आहे. सरकारांना, स्थानिक प्रशासनांना, देशाच्या नागरिकांना पुन्हा सतर्कता दाखवावी लागेल, असे मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 12:18 am

Web Title: free grain until november prime ministers announcement abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 संभाव्य लसीचा पहिला लाभ करोनायोद्धय़ांना!
2 करोनाचे ६० टक्के रुग्ण ठणठणीत
3 भारत-चीन यांच्यात लष्करी पातळीवर पुन्हा चर्चा
Just Now!
X