बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या धाडसी कारवाईचं कौतुक केलं आहे. जवानांच्या शौर्याला सलाम करत त्यांनी म्हटलं की, जर भाजपाआधीच्या सरकारने आपल्या लष्कराला फ्री हॅण्ड दिला असता तर उत्तम झालं असतं. मायावती यांनी ट्विट करुन आपलं मत व्यक्त केलं. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, ‘जैशच्या दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलाच्या शूर जवानांनी केलेल्या धाडसी कारवाईला सलाम आणि सन्मान’.

पुढे त्यांनी म्हटलं की, ‘आपल्या लष्कराला भाजपा सरकारच्या आधी असणाऱ्यांनी फ्री हॅण्ड दिला असता तर बरं झालं असतं’. मायावती यांनी अजून एक ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ‘पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. पण हाच निर्णय मोदी सरकारने आधीच घेतला असता तर पठाणकोट, उरी आणि पुलवामासारख्या घटना घडल्या नसता न इतके जवान शहीद झाले नसते’.

भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पावणेचार वाजता पाकिस्तानातील बालाकोट येथील जाभामधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले करत तळ उद्ध्वस्त केले. पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 41 जवान शहीद झाले होते. भारताने या दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देत जवळपास 300 दहशतवाद्यांना ठार केलं. हल्ल्यात मसूद अझहरचे दोन भाऊ आणि मेहुणा मारला गेला.