नोईडा येथील कंपनीने तयार केलेल्या फ्रीडम-२५१ या स्मार्टफोनची किंमत अवघी २५१ रुपये असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच त्याला मोठा प्रतिसाद मिळाला ही बाब नाकारता येत नाही, पण या फोनच्या निर्मितीसाठी सरकारने कुठलेही अनुदान दिलेले नाही असे समजते. या फोनच्या विक्रीतून एका नगामागे कंपनीला ३१ रुपये नफा मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. आता डाटाविंड कंपनीनेही २९९९ रुपयात स्मार्टटॅब देण्यासाठी जोरदार जाहिरातबाजी सुरू केली आहे. या कंपनीला प्राप्तिकर व अबकारी कर अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणीही केली आहे.  शिवाय कॉपीराईटचा भंग केल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. कंपनीचे मालक मोहित गोयल यांनी सागितले की, माझ्यावर उगीचच आरोप केले जात आहेत, मी काय चूक केली, मला भगोडा का म्हटले गेले हे समजत नाही. मला व्यवसाय करायचा आहे व तो स्टार्टअपसारखा आहे, माझ्याकडे त्याची योजना तयार

आहे. तीन दिवसात ७ कोटी स्मार्टफोनचे बुकिंग झाले आहे. माझ्याकडे जे पैसे जमा झाले आहेत ते बंदिस्त खात्यात ठेवणार आहे व स्मार्टफोन लोकांना दिल्यानंतरच त्या पैशांना मी हात लावेन. अ‍ॅपलच्या आयफोनचा आयकॉन चोरल्याचा आरोप त्यंनी फेटाळला. काही स्मार्टफोन अ‍ॅडकॉमचे चिन्ह होते. त्यांचे काही पॅनेल्स आम्ही तात्पुरते घेतले होते, पण अंतिम फोन आमचाच स्वत:चा असेल. जी गुणवैशिष्टय़े सांगितली तसाच फोन आम्ही देऊ. रींगिंग बेल्सचे अध्यक्ष अशोक चढ्ढा यांनी सांगितले की, आमचे व्यावसायिक प्रारूप योग्य आहे, २५१ रुपये किंमत ठेवली तरी आम्ही नफा कमावणार आहोत. अ‍ॅप्स व ऑनलाईन विक्रीमुळे ही किंमत आम्हाला कमी ठेवता आली. अनेक ई कॉमर्स कंपन्यांशी कंपनीने करार केले आहेत व त्यात गोबिबो या प्रवासी कंपनीच्या वेबसाईटचा समावेश आहे. आमच्या स्वत:च्या वेबसाईटमधूनही आम्हाला पैसा मिळतच आहे.

दरम्यान फोनच्या घोषणेनंतर तो लगेचच वितरित करणार असल्याची हमी देणारी व्हाउचर्स नोईडात वाटण्यात आली पण त्याच्याशी आमचा काही संबंध नाही असे कंपनीने सांगितले.

चढ्ढा यांनी सांगितले की, पहिल्या २५ लाख ग्राहकांना मोबाईल फोन पाठवण्यात येईल. दहा एप्रिलपासून ते पाठवले जातील व हे काम जूनपर्यंत पूर्ण होईल. यासाठी उत्तरांचल व नोईडात २५० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.