देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून भारतातील हक्क आणि नागरी स्वातंत्र्याचा ऱ्हास सुरू झाला असून, भारतातील वातावरण ‘मुक्त’पासून ते ‘अंशत: मुक्त’ अशा स्थितीपर्यंत घसरले असल्याचा अहवाल वॉशिंग्टनमधील ‘फ्रीडम हाऊस’ या जागतिक स्तरावरील संस्थेने दिला. या अहवालावरून आता मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे. मात्र, भाजपाच्या खासदाराने अहवालातील निष्कर्ष फेटाळून लावले आहेत. ‘फ्रीडम हाऊस’चा अहवाल हा भारतविरोधी कटाचाच भाग असल्याचा दावा भाजपा खासदार प्रा. राकेश सिन्हा यांनी केला आहे.

‘फ्रीडम हाऊस’च्या अहवालात अनेक मुद्द्यांचा संदर्भ दिला आहे. या अहवालात सर्वात मुक्त वातावरण असलेल्या देशासाठी एकूण १०० गुण आहेत. यात भारताचे गुण ७१ वरून ६७ वर इतके घसरले आहेत. ‘बीबीसी हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत खासदार सिन्हा यांनी या अहवालाविषयी भूमिका मांडली आहे. “हे साम्राज्यवादी षडयंत्र आहे. भौगोलिक साम्राज्यवाद संपला असला, तरी वैचारिक साम्राज्यवाद अजूनही तसाच आहे,” असं सिन्हा यांनी म्हटलं आहे.

“भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर लोक पूर्ण स्वातंत्र्यानिशी सरकारी धोरणांवर आणि न्यायव्यवस्थेवर टीका करू शकत आहेत. पण, पश्चिमेकडील (अमेरिका) एक शक्ती भारताची स्वतःच्या नजरेतून मांडणी करत आहे. त्यामुळेच हा अहवाल पूर्णपणे भारतविरोधी कटाचा भाग आहे. त्यांची दृष्टी किती दूषित आहे, हे यातून दिसतं. भारतात दररोज शेकडो टीव्ही चॅनेल स्वतंत्रपणे वादविवाद, चर्चो होतेय. वृत्तपत्रांवर कोणतंही नियंत्रण नाहीये. सोशल मीडियालाही पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. मग हे स्वातंत्र्य नाही, तर आणखी काय आहे?,” असा सवालही सिन्हा यांनी ‘फ्रीडम हाऊस’च्या अहवालावर टीका करताना उपस्थित केला आहे.

काय म्हटलंय अहवालात?

‘फ्रीडम हाऊस’ या संस्थेने मुस्लिमांवरील हल्ले, देशद्रोह कायद्याचा वापर आणि टाळेबंदीसह सरकारचा करोनाविरोधातील लढा यांचा विशेष संदर्भ दिला आहे. सर्वात मुक्त वातावरण असलेल्या देशासाठी एकूण १०० गुण आहेत त्यामध्ये भारताचे गुण ७१ वरून ६७ वर घसरले आहेत. त्याचप्रमाणे २११ देशांमध्ये भारताचे स्थान ८३ वरून ८८ वर घसरले आहे. मोदी यांचे हिंदू राष्ट्रवादी सरकार मानवी हक्क संघटनांवर दबाव वाढवत आहे, शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकार यांच्यात दहशतीचे वातावरण परसवण्यात येत आहे आणि झुंडबळीसह मुस्लिमांना लक्ष्य करण्यात येणारे धार्मिक हल्ले केले जात आहेत. मोदी हे २०१९ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर भारताची घसरण अधिकच झाली.