फ्रान्समधील लक्झरी उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी एलव्हीएमएचने पतंजली आयुर्वेदमध्ये ५०० मिलियन डॉलर (३२५० कोटी) गुंतवण्याची उत्सुकता दाखवली आहे. एल केटर्टन आशियाचे व्यवस्थापकीय भागीदार रवी ठाकरन यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. पतंजलीचे प्रवक्ते एस के गुप्ता तिजारावाला यांनी ट्विट करून ही माहिती दिली. आचार्य बालकृष्ण यांच्या हवाल्याने त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, आपण आपल्या विकासासाठी परकीय तंत्रज्ञान वापरतो. मग देशाच्या भल्यासाठी विदेशातून आलेला निधी वापरण्यास काहीच अडचण नाही. पण आम्ही आमच्या अटींवर काम करू. आम्ही आमचा हिस्सा देणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

नागपूर, ग्रेटर नोएडा, आसाम, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, हरयाणा आणि राजस्थानमध्ये १०,१०० एकर जागेत प्रकल्प उभारण्यासाठी पतंजली ५००० हजार कोटी रूपये गुंतवत आहे, असेही बालकृष्ण यांनी म्हटल्याचे ट्विटमध्ये म्हटलेय.

पतंजलीला ५००० कोटींचे कर्ज घ्यायचे आहे. कंपनीला बँकांकडून कमी दरात कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी अनेक विदेशी गुंतवणूकदारांबरोबर बैठकी ठरवण्यात आल्या आहेत. पण पतंजलीचा हिस्सा विकण्यात येणार नाही, असे बालकृष्ण म्हणाले. पतंजलीने बाजारपेठेत घेतलेल्या आघाडीमुळे हिंदुस्तान युनिलिव्हर, कोलगेट, पामोलिव्ह आणि डाबरसारख्या जागतिक आणि भारतीय कंपन्यांनाही आयुर्वेद उत्पादनांमध्ये उतरावे लागले आहे.

एलव्हीएमएच कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय भागीदार रवी ठाकरान म्हणाले की, पतंजली ग्लोबल कंपनी बनू शकते. त्यांनी आपली उत्पादने अमेरिका, जपान, चीन, दक्षिण कोरिया आणि युरोप सारख्या देशांमध्येही विकले पाहिजे. यासाठी एल कॅटर्टन त्यांना मदत करू शकते. विशेष म्हणजे रामदेव बाबांनी पतंजलीला स्वदेशी उत्पादने म्हणून बाजारात आणले आहे. आपल्या जाहिरातीत ते वारंवार परदेशी कंपन्यांना विरोध करताना दिसतात. त्यामुळे एलव्हीएमएचच्या प्रस्तावानंतर पतंजलीकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

[jwplayer iJwXXZEi-1o30kmL6]