शार्ली एब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या अंकाचे वितरण ७० लाख प्रतींपर्यत गेले आहे. अर्थात हा खप हल्ल्यानंतरच्या अंकाचा म्हणजे सव्‍‌र्हायवल एडिशनचा आहे. त्यातील ६३ लाख प्रती फ्रान्समध्येत खपल्या आहेत. इस्लामी अतिरेक्यांनी या साप्ताहिकावर हल्ला करून १२ जणांना ठार केले होते, त्यानंतर जगभरातून संतप्त भावना व्यक्त झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या हल्ल्यातही फ्रान्समध्ये पाच जण ठार झाले होते.
या साप्ताहिकाच्या सात लाख प्रती परदेशात वितरणासाठी पाठवण्यात आल्याचे वितरक मेसन्जरीज लायोनायसिस डी प्रेसी यांनी सांगितले.
१४ जानेवारीला हा अंक प्रसिद्ध झाला होता. या साप्ताहिकाचा नेहमीचा खप ६० हजार होता. या साप्ताहिकाची छपाई सुरूच असून ते उपलब्ध करून दिले जात आहे. जेवढे अंक वितरित केले होते तेवढे संपले आहेत. अनेक आठवडय़ांत किती अंक विकले गेले याची मोजदादही केलेली नाही. फ्रान्सबाहेरही या साप्ताहिकाला मागणी असून शेजारच्या बेल्जियममधून ती जास्त आहे.