07 July 2020

News Flash

फ्रान्समध्ये १५०हून अधिक ठिकाणी छापे

फ्रेंच पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांची धरपकड करण्यासाठी पहाटे देशभरात १५० हून अधिक ठिकाणी छापे टाकले.

पॅरिस येथील दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सॉरबोन विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळली

मुस्लीम दहशतवादी निशाण्यावर
‘आयसिस’ने पॅरिसवर केलेल्या नृशंस हल्ल्यांनंतर फ्रेंच पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांची धरपकड करण्यासाठी सोमवारी पहाटे देशभरात १५० हून अधिक ठिकाणी छापे टाकले.
फ्रान्सच्या आग्नेय भागात असलेल्या लिऑन शहरात शस्त्रास्त्रांचा साठा आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पंतप्रधान मॅन्युअल वाल्स यांनी सांगितले. पॅरिसचे पूर्व उपनगर असलेल्या बॉबिग्नीसह अनेक शहरांमध्ये पहाटेच्या सुमारास छापे टाकण्यात आले. एकटय़ा लिऑनमध्येच तीस छापे टाकल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी रॉकेट लॉन्चर, कॅलॅश्निकोव्ह रायफल, बुलेटप्रूफ जाकिटे, हँडगन्स आणि युद्धात वापरण्यात येणारी उपकरणे असा मोठाच शस्त्रसाठा हस्तगत केला. तुलाँ या फ्रान्सच्या नैर्ऋत्य भागात वसलेल्या शहरात तिघा जणांना अटक करण्यात आली. आल्प्स पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या ग्रेनोबल शहरात डझनभर संशयितांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे बंदुका आणि पैसे सापडल्याचे वृत्त ‘ल दुफाईन लायबर’ या स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे. फ्रान्समध्ये आणीबाणीची परिस्थिती घोषित करण्यात आल्यानंतर पोलीस जास्तीच्या अधिकारांनी सज्ज झाले आहेत. मागील शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात १२९ जण मृत्युमुखी पडले होते, तर ३५०हून अधिक जण जखमी झाले होते.

बेल्जियममध्येही मोहीम
ब्रुसेल्स
पॅरिस हल्ल्यातील संशयित दहशतवादी ब्रसेल्समध्ये जिथे राहिले, त्या मोलेनबीक शहरात बेल्जियन पोलिसांनी मोठी मोहीम राबवीत सात संशयितांना अटक केली. पॅरिस हल्ल्यात आत्मघातकी बॉम्ब बनून स्वतला उडवून देणारा ब्राहिम अब्देसलाम हा बेल्जियमस्थित फ्रेंच नागरिक याच शहरात राहत होता. त्याने पॅरिसच्या ‘बुलेवार्ड व्हॉल्तेअर’ रस्त्यावरील एका बारबाहेर आत्मघातकी हल्ला घडवून आणला होता. पोलिसांनी मोलेनबीकमधल्या नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे या कारवाईची कल्पना दिली. बेल्जियन प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांनी एका घराला घेरून रहिवाशांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कारवाईत अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. फ्रेंच पोलिसांनी अब्देसलामचा भाऊ सलाह याला पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधमोहीम सुरू केली आहे. त्यानेदेखील पॅरिस हल्ल्यांमध्ये कळीची भूमिका बजावल्याचा पोलिसांचा कयास आहे.

पॅरिस संशयिताची माहिती
नाव – आब्देलहमिद अबाऊद ऊर्फ अबु उमर अल बाल्यिकी
वय – २७
राष्ट्रीयत्व – मूळ देश – मोरोक्को, सध्या बेल्जियमचा नागरिक
* ब्रसेल्समधील सर्वात प्रसिद्ध शाळेत तो जात होता. शाळेत तो एक खुशाल मुलगा म्हणून ओळखला जात होता. बेल्जियममधील आयसिसच्या गटाचा तो प्रमुख आहे. जानेवारी २०१५ मध्ये बेल्जियममधील वर्वियर्स येथे आयसिसच्या गटाविरुद्ध कारवाई करताना झालेल्या गोळीबारप्रकरणी सुरक्षा दलांना तो हवा होता. त्याने अनेक तरुणांची आयसिससाठी भरती केली. त्यात त्याच्या १३ वर्षांच्या भावाचाही समावेश आहे. वर्वियर्स येथे मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाच्या भावाला त्याने ग्रीसमधून फोन केल्याचेही वृत्त आहे.
* मृतांनी भरलेली कार चालवताना त्याची एक चित्रफीत प्रसिद्ध झाली होती. त्यातून त्याची जगाला प्रथम ओळख झाली.
* फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मते त्याचा ऑगस्टमध्ये पॅरिसला जाणाऱ्या रेल्वेवर हल्ला करण्यात आणि एप्रिलमध्ये पॅरिसमधील एका चर्चवरील हल्ल्यात सहभाग होता.
* त्याने जानेवारी २०१४ मध्ये सीरियातील संघर्षांत भाग घेतला होता. त्यानंतर तो ग्रीसला गेल्याचे सांगितले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2015 2:37 am

Web Title: french police carry out 150 raids over paris attacks
Next Stories
1 पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार सीरियात
2 भ्रष्टाचार व काळय़ा पैशाला आळा घालण्यासाठी नवीन खरेदी कायदा
3 मानवी भाषा समजणारे मेंदूतील न्यूरॉन्सचे कृत्रिम जाळे विकसित
Just Now!
X