फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. करोनाच्या काळामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी तिजोरीतील खर्च अनावश्यक गोष्टींसाठी करण्यावरुन विरोधकांनी सध्या मॅक्रॉन यांना धारेवर धरलं आहे. फ्रान्समधील राष्ट्रपती भवन असणाऱ्या अलिसी पॅलेसमध्ये मॅक्रॉन यांनी सन २०२० मध्ये फक्त फुलांच्या सजावटीसाठी तब्बल सात लाख २९ हजार डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार पाच कोटी ३६ लाख २७ हजार ७९१ रुपये खर्च केले आहेत. एकीकडे करोनाचा सर्वाधिक फटका बसलेला देश म्हणून जगभरामध्ये फ्रान्सचं नाव चर्चेत असताना आणि देशासमोर करोनासारखे मोठे संकट असताना राष्ट्राध्यक्षांनी केलेली ही उधळपट्टी आता चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधी पक्षांबरोबरच फ्रान्समधील सर्व सामान्य जनतेनेही सोशल मीडियावर मॅक्रॉन यांच्या या अनावश्यक खर्चावरुन राष्ट्रध्यक्षांवर टीका केलीय.

फ्रान्समधील पोलिटिस या मासिकाने सर्वात आधी ही बातमी दिली आहे. या वृत्तानुसार मॅक्रॉन यांनी खर्चाच्या बाबतीत फ्रान्समधील आधीच्या सर्व राष्ट्राध्यक्षांचे विक्रम मोडीत काढले आहेत. मॅक्रॉन यांच्या पुर्वी राष्ट्राध्यक्ष पद भूषवणाऱ्या फ्रांकोइस होलांदे यांनी २०१५ मध्ये एक लाख ६२ हजार डॉलर (एक कोटी १९ लाख १७ हजार २८७ रुपये) तर निकोलस सरकोजी यांनी २०११ मध्ये एक लाख ७४ हजार डॉलर (एक कोटी २८ लाख ४९ रुपये) खर्च केले होते.

आणखी वाचा- आत्मनिर्भर तुर्की; WhatsApp वर टाकला बहिष्कार, राष्ट्राध्यक्षांनीही सुरु केला ‘या’ ‘मेड इन तुर्की’ अ‍ॅपचा वापर

ही बातमी समोर आल्यानंतर फ्रान्समधील सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेकांनी हा करदात्यांच्या खिशातून जमा केलेला सरकारी निधीतून झालेला खर्च टाळता आला असता असं म्हटलं आहे. तर काहींनी यावरुन अगदी कठोर शब्दांमध्ये फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना खडे बोल सुनावले आहेत. देशसमोर करोनासारखे संकट असताना आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल सुरु असताना राष्ट्राध्यक्षांनी केवळ सजावटीसाठी एवढा पैसा खर्च करणं योग्य नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. फ्रान्स सरकारने नुकतंच करोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी १२१ बिलियन डॉलरचे आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे.