पॅरिस : फ्रान्सचे पंतप्रधान एदुआर्द फिलीप यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. हा फेरबदल अपेक्षित मानला जात होता.

अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या कारकीर्दीत नवा अध्याय सुरू करण्याचे ठरवले असून फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याचे ठरवले आहे. सध्या करोनामुळे फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा धक्का बसला आहे.

स्थानिक वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत मॅक्रॉन यांनी म्हटले आहे की, देशाची फेरउभारणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यासाठी नवा मार्ग वापरावा लागेल. रविवारच्या पालिका निवडणुकीपूर्वी तसेच  करोना काळात मॅक्रॉन यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे मतदानापूर्वीच त्यांनी खांदेपालटाचे संकेत दिले होते.

मॅक्रॉन यांच्या पक्षाला निवडणुकीत अनेक मोठय़ा शहरात पराभवाचा फटका बसला आहे. ग्रीन पार्टीने त्यात आघाडी  घेतली.  मार्च व एप्रिलमध्ये करोनाची साथ शिखरावस्थेत होती त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली.

मॅक्रॉन यांची उद्योग धोरणे श्रीमंतांना अनुकूल असल्याची टीका होऊन ‘येलो व्हेस्ट’ ही आर्थिक चळवळ सामाजिक अन्यायाविरोधात सुरू झाली होती. पेन्शन सुधारणा कार्यक्रमाविरोधात हिवाळ्यात मोठय़ा प्रमाणात निदर्शने झाली होती.