फ्रान्समध्ये हल्लेखोर पोलिसांकडून ठार

पॅरिस : प्रेषित महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रे दाखवून या विषयावर चर्चा घडविणाऱ्या येथील इतिहासाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. या प्रकरणातील संशयित १८ वर्षीय चेचेन मुलास पोलिसांनी गोळ्या झाडून ठार केले. महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्रांवरून तीन आठवडय़ांत झालेला हा दुसरा हल्ला आहे.

‘शार्ली एब्दो’वरील हल्ल्याची सुनावणी सुरू झाल्याच्या निमित्ताने पैगंबरावरील व्यंगचित्रे पुनप्र्रकाशित करण्यात आली होती. मॅक्रॉन सरकार आता मूलतत्त्ववादाला आळा घालण्यासाठी एक विधेयक आणणार आहे.

गेल्या महिन्यात एका पाकिस्तानी तरुणाने दोन जणांना सुऱ्याने भोसकले होते. त्याला नंतर अटक करण्यात आली. ही व्यंगचित्रे प्रकाशित करणाऱ्या शार्ली एब्दो या वृत्तपत्राच्या कार्यालयाजवळ हा प्रकार झाला होता. २०१५ मध्ये ही व्यंगचित्रे पहिल्यांदा शार्ली एब्दोने प्रकाशित केली होती. त्या वेळी त्यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात कर्मचाऱ्यांसह १२ जण ठार, तर ११ जण जखमी झाले होते. फ्रान्सच्या दहशतवादविरोधी कार्यालयाच्या प्रवक्ताने सांगितले की, कॉनफ्लास-सेंट-होनोराइन येथे झालेल्या आताच्या या भयानक प्रकारात आणखी नऊ संशयितांना अटक केली आहे. त्यात हल्लेखोर मुलाचा भाऊ, आईवडील, आजी-आजोबा यांचा समावेश आहे.

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारच्या हल्ल्यातील हल्लेखोर अठरा वर्षीय मुलास ठार करण्यात आले. त्याने शिक्षकाचा शिरच्छेद केलेल्या ठिकाणापासून ६०० मीटर अंतरावर त्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्याकडे चाकू होता. त्याने एअरसॉप्ट गनमधून  गोळ्या झाडल्या.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्या शाळेस शुक्रवारी रात्री भेट दिली. त्यांनी या इस्लामी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून त्या विरोधात एकजुटीचे आवाहन केले.

दहा दिवस आधी धमक्या

संबंधित शिक्षकाने या व्यंगचित्रांवर चर्चा सुरू केल्यानंतर दहा दिवसांपूर्वी त्याला धमक्या देण्यात आल्या होत्या. संशयित आरोपी मुलाच्या आईवडिलांनी शिक्षकाविरोधात तक्रारही दाखल केली होती.