रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात नवी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गोस्वामी यांना बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. यावेळी गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांच्या कारवाईला विरोध केला. यावेळी अर्णब यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.  त्यामुळे त्यांच्यावर कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

रिपब्लिकचा काय दावा?

पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर ‘रिपब्लिक’ने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.

अर्णब गोस्वांमी यांनी १० पोलीस कर्मचारी घरात घुसले आणि घराबाहेर येण्यासाठी जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी रिपब्लिकचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी आणि संजय पाठक यांना घरात जाण्यापासून रोखल्याचंही सांगण्यात आलं आहे. अटकेची कारवाई करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांच्या घराबाहेर पोलिसांची ८ वाहनं आणि ४० ते ५० कर्मचारी उपस्थित होते असा दावा आहे. निरंजन यांना रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आल्याचाही रिपब्लिकचा दावा आहे.