भारत सरकारतर्फे दरवर्षी प्रजासत्ताकदिनाच्या पुर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा होते. यंदा वेगवेगळ्या श्रेत्रातील ९४ व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चार जणांना पद्मविभूषण, १४ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अगदी समान्यांपासून ते नावाजलेल्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. मात्र यातही एका नाव जास्त खास आहे ते नाव म्हणजे फ्रेडरिक एरिना ब्रूनिंग. आता नाव वाचून हे लक्षात आलचं असेल की हे परदेशी नाव आहे. मात्र नाव परदेशी असले तरी त्यांचे कामही विशेष आहे. मथुरेमध्ये फ्रेडरिक यांनी चक्क १८०० अनाथ गायींचा गोठा उभारला आहे. त्यांच्या या कार्यासाठी भारत सरकारने त्यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.
भारत सरकारने माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर फ्रेडरिक यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली. या पुरस्कारामुळे इतर लोकही प्रेरणा घेतील अशी मला अपेक्षा असल्याचेही फ्रेडरिक यांनी सांगितले. लोकांनी प्राणी मात्रांवर दया करावी हाच संदेश मी सर्वांना देईल असंही त्या म्हणाल्या.
साधारण २५ वर्षांपूर्वी ३६ वर्षीय फ्रेडरिक बर्लिनमधून भारतामध्ये पर्यटनासाठी आल्या होत्या. उत्तर प्रदेशमधील मथुरेमध्ये भटकंती करत असताना तेथे रस्त्यावरील अनेक गायी त्यांना दिसल्या. त्या गायींना पाहाता क्षणीच फ्रेडरिक त्या गायींच्या प्रेमात पडल्या. नंतर त्यांनी मथुरेतच राहून या गायींसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. या गायींसाठी काय करता येईल असा विचार करत असतानाच यापैकी अनेक गायींना जखमा झाल्या असून त्यांना योग्यप्रकारे खायला मिळत नाही हे फ्रेडरिक यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अशा भटक्या गायींना निवारा देण्याचा निर्णय घेत पुढील आयुष्य या गायींची सेवा करण्यासाठी वाहून घेण्याचा निश्चय केला.
मथुरेतील लोकवस्तीपासून दूरवर फ्रेडरिक यांनी गोशाळा उभारली असून येथे त्यांनी रस्त्यावरील भटक्या गायींची सेवा सुरु केली. जर्मनीमधील वडिलांची काही संपत्ती विकून त्यांनी या गोशाळेची स्थापना केली. आज त्यांच्या गोशाळेमध्ये १८०० हून अधिक गायी आणि वासरांचा समावेश आहे. एका छोट्या अंगणात फ्रेडरिक यांनी सुरु केलेले हे काम आज या पुरस्कारामुळे जगभरात पोहचले आहे. गायींची संख्या वाढल्यानंतर त्यांनी आता राधाकुंड येथे सुरभी गोशाला निकेतन नावाने दुसरी गोशाळा सुरु केली आहे.
मागील अडीच दशाकांपासून मथुरेमध्ये गोसेवा करणाऱ्या फ्रेडरिक आता ६१ वर्षांच्या झाल्या आहेत. मथुरेतील स्थानिक लोक आता त्यांना ‘गोमाता की आश्रयदाता’ म्हणून ओळखतात तर ‘सुदेवी माताजी’ या नावाने हाक मारतात. गायी या माझ्या मुलांप्रमाणे आहेत. मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही असं सांगणाऱ्या फ्रेडरिक या सध्या १८०० गायींचा सांभाळ करतात. यासाठी त्यांना महिन्याला ३५ लाख इतका खर्च येतो. फ्रेडरिक यांनी आपल्या गोळाशाळेमध्ये ६० स्थानिकांना रोजगार दिला आहे. गायांचे खाद्य, त्यांना पुरवण्यात येणारी वैद्यकीय सेवा, कर्मचाऱ्यांचे वेतन यासाठी महिन्याला ३५ लाखांचा खर्च येतो. मुळच्या जर्मनीमधील असणाऱ्या फ्रेडरिक यांना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीमधून दरमहा ६ ते ७ लाख रुपये मिळतात. ते पैसेही त्या या गोशाळेचा खर्च भागवण्यासाठी वापरतात. त्यांनी रस्त्यावरील अंध आणि जखमी जनावरांना पकडून आणून त्यांच्यासाठी स्वतंत्र गोठा उभारला आहे.
‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याने आनंद झाल्याचे फ्रेडरिक यांनी सांगितले असले तरी त्यांनी एक खंतही बोलून दाखवली आहे. ‘दरवर्षी मला व्हिजा रिन्यू करावा लागतो. त्यामुळे भारत सरकारने आता मला दिर्घकालावधीचा व्हिजा किंवा भारतीय नागरिकत्व द्यावे’, अशी मागणी फ्रेडरिक यांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 4:38 pm