नवी दिल्लीतील जसोला येथील मॉलच्या बाहेर झालेल्या प्रॉपर्टी डीलरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे. आरोपी मृत व्यक्तीच्या पत्नीच्या संपर्कात होता. यामुळे नाराज होऊन त्याने आरोपीच्या कानाखाली मारली होती. ज्यामुळे संतापलेल्या आरोपीने हत्येचा कट आखला होता. मॉलच्या बाहेर एकत्र दारु प्यायल्यानंतर आरोपीने गोळी मारुन हत्या केली. सुरुवातीला मृत्यूचं कारण समोर आलं नव्हतं. नंतर गोळी लागल्यानेच हत्या झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं.

डीसीपी चिन्मय बिश्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘२० जानेवारी रोजी ३५ वर्षीय मोहम्मद राशिद यांचा मृतदेह मॉलच्या बाहेर एका कारमध्ये सापडला होता. सर्व गोष्टी जागेवर असल्याने हे चोरीचं प्रकरण नसल्याचं स्पष्ट होत होतं. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला’.

सीसीटीव्ही फुटेज तपासला असता तौफीक उर्फ सोनू दारुच्या अड्ड्यावर राशीदसोबत असल्याचं दिसलं. आऱोपी हरियाणाच्या पलवलचा रहिवासी आहे. पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला आपण दारु पिऊन झाल्यानंतर तेथून निघून गेलो असा दावा केला. पण कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. राशिद आणि आपण गेल्या १५ वर्षांपासून मित्र असल्याचंही त्याने सांगितलं.

दोघांमध्ये जवळपास रोज फोनवर बोलणं होत होतं. १४ वर्षांपूर्वी राशीदच्या पत्नीशी त्याचं लग्न ठरलं होतं. पण काही कौटुंबीक कारणामुळे लग्न रद्द झालं होतं. पण यानंतरही तौफिक राशीदच्या पत्नीशी संपर्कात होता. यावरुन राशीद आणि तौफिकमध्ये वाद होत असे. तौफिकच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल पोलिसांनी जप्त केली आहे. पिस्तूल पुरवणाऱ्याचाही शोध लागला आहे.