आपल्याकडे मागच्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या अनेक रुढी-परंपरा आजही कायम सुरु आहेत. असेच एक उदाहरण वाराणसीमध्ये नुकतेच पाहायला मिळाले आहे. ज्याठिकाणी पाऊस पडण्यासाठी नकली बेडकांचे लग्न लावण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असून येथील काही लोकांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. शहरात पाऊस यावा यासाठी ही प्रचलित असणाऱ्या धारणेसाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या लग्नाला मध्यप्रदेशच्या मंत्री ललिता यादव यांनीही उपस्थिती लावली होती. त्या म्हणाल्या, आम्ही बुंदेलखंड प्रांतातील शेतकऱ्यांवर आलेले दुष्काळाचे सावट दूर व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना केली.

अशाप्रकारे बेडकांचे लग्न लावल्यास इंद्र देवता प्रसन्न होते आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो अशी पुराणकथा आहे. असेही या लग्नाचे आयोजन केलेल्यांनी सांगितले. यावेळी विधिवत पद्धतीने बेडकाच्या नर आणि मादीचे लग्न लावण्यात आले. शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करुन हा सोहळा पार पडला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरावर उपस्थितांनी मनसोक्त डान्सही केला. या लग्नाला अनेक नवविवाहीत जोडपी उपस्थित होती. महिलांनी वर आणि वधूला शुभेच्छा देणारे गाणेही गायले. यावेळी गोडाधोडाचे जेवणही ठेवण्यात आले होते.