18 October 2019

News Flash

राफेल डीलवरुन राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना अनिल अंबानींनी दिले उत्तर

फ्रान्सबरोबर राफेल फायटर विमानांचा खरेदी करार करताना स्थानिक भागीदार म्हणून उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची निवड कशी झाली ?

फ्रान्सबरोबर राफेल फायटर विमानांचा खरेदी करार करताना स्थानिक भागीदार म्हणून उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची निवड कशी झाली ? असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यावर स्वत:हा उद्योगपती अनिल अंबानी यांनी राहुल गांधींना पत्र लिहून उत्तर दिले आहे. रिलायन्स समूह फायटर विमान निर्मितीच्या क्षेत्रात अनुभवहीन असल्याचा राहुल गांधींचा आरोप अनिल अंबानी यांनी फेटाळून लावला आहे.

राफेलची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सच्या दासॉल्ट कंपनीने स्थानिक भागीदार म्हणून रिलायन्स डिफेन्सची निवड केली. त्यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नाही असे त्यांनी म्हटले आहे. १२ डिसेंबर २०१७ रोजी अनिल अंबानी यांनी राहुल गांधींना पत्र लिहून राफेल विमानांच्या कराराबद्दल खुलासा केला होता. रिलायन्स डिफेन्सला राफेलचे अब्जावधीचे कंत्राट कसे मिळाले ? यावरुन राहुल गांधी त्यावेळी सरकारला लक्ष्य करत होते.

गांधी कुटुंबाबरोबर आपल्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. पण काँग्रेस पक्षाकडून माझ्या कंपनीबद्दल जी विधाने केली जातायत त्याने आपल्याला व्यक्तीगत दु:ख झाले आहे असे अनिल अंबानी यांनी पत्रात म्हटले आहे. आमच्याकडे अनुभवच नाहीय तर संरक्षण उत्पादनात काही क्षेत्रात आम्ही आघाडीवर आहोत असा दावा अनिल अंबानी यांनी या पत्रात केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनिल अंबानी यांनी हे पत्र लिहिले होते. त्यावेळी राफेल करारावरुन काँग्रेसकडून सरकारवर अनेक आरोप करण्यात आले होते. गुजरात पिपावाव येथे रिलायन्स डिफेन्सचा खासगी क्षेत्रातील सर्वात मोठा जहाज बांधणी कारखाना असून तिथे भारतीय नौदलासाठी पाच गस्ती जहाजे आणि भारतीय तटरक्षक दलासाठी १४ गस्ती जहाजे बांधण्याचे काम सुरु आहे असे त्यांनी पत्रात म्हटले होते.

भारत आणि फ्रान्स दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारातंर्गत भारताने फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने विकत घेण्याचा निर्णय घेतला. या ३६ विमानांची निर्मिती फ्रान्समध्ये होणार असून उड्डाणवस्थेत ती सर्व विमाने भारतीय हवाई दलाकडे सोपवण्यात येतील. त्यामध्ये कुठल्याही भारतीय कंपनीची काहीही भूमिका असणार नाही.

विमानांचे सुट्टे भाग बनवण्यासाठी आमचा दासॉल्ट कंपनीबरोबर करार झाला. त्यांनी रिलायन्स डिफेन्सची निवड केली. हा संपूर्णपणे स्वतंत्र करार असून त्यामध्ये सरकारची काही भूमिका नाही असे अनिल अंबानी यांनी पत्रात म्हटले आहे. दासॉल्ट बरोबर झालेल्या करारामुळे भारतात हजारो लोकांना रोजगार मिळेल तसेच भारतीय इंजिनिअर्सना एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये खूप काही शिकता येईल. नवीन अनुभव मिळेल. नव्या छोटया, मध्यम, स्टार्टअप कंपन्यांना यातून रोजगाराच्या संधी मिळतील असे अनिल अंबानी यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.

First Published on July 25, 2018 9:43 pm

Web Title: from letter anil ambani answers to rahul gandhi on rafale deal