दिल्ली विद्यापीठावर येत्या १ मेपासून कायमस्वरूपी तिरंगा फडकणार आहे. १ मे रोजी दिल्ली विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसह अनेक मान्यवर हजेरी लावणार आहेत. दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय विद्यापीठांचे कुलगुरू आणि स्मृती इराणी यांच्यात झालेल्या बैठकीत कुलगुरूंनी आपापल्या विद्यापीठाच्या आवारात ठळकपणे आणि अभिमानाने तिरंगा ध्वज फडकवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दिल्ली विद्यापीठाकडून १ मे रोजी जंगी कार्यक्रमात विद्यापीठाच्या आवारात तिरंगा फडकवण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवाद आणि देशाविषयी अभिमानाची भावना निर्माण व्हावी, यासाठी केंद्रीय विद्यापीठांच्या आवारात कायमस्वरूपी तिरंगा ध्वज फडकवण्याचा ठराव १८ फेब्रुवारी रोजी संमत करण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.