इ-कचरा चर्चासत्रात संशोधकाचा दावा, कचऱ्यावर प्रक्रिया आवश्यक, इ-कचरा निर्मितीत भारत तिसरा

इलेक्ट्रॉनिक कचरा ही आपल्यासाठी डोकेदुखी असली तरी हा कचरा काहींसाठी मौल्यवान ठरतो. सोने, चांदीसाठी आपण खाणकाम करतो, पण इ-कचऱ्यातून हे मौल्यवान धातू मोठ्या प्रमाणात मिळतात असे एका वैज्ञानिकाने म्हटले आहे. साधारण १० लाख निकामी मोबाइलमधून ५० पौंड सोने व २० हजार पौंड तांबे मिळत असते; फक्त त्यासाठी त्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी लागते.

झेविएर स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक प्रणबेश रे यांनी सांगितले की, इ-कचऱ्यांचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. जगात ६.४५ कोटी टन कचरा वर्षांला निर्माण होतो, त्यातील चाळीस टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. इ-कचरा निर्मितीत भारत तिसरा आहे. २०१४  मध्ये भारतात १७ लाख टन इ कचरा निर्माण झाला होता. इ-कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे व तो पर्यावरणाचा मोठा प्रश्न आहे. सामान्य माणसे इ-कचरा निर्माण करीत असतात त्यांना त्याच्या विल्हेवाटीचे अजिबात गांभीर्यही नसते. जर हे असेच चालू राहिले तर इ-कचऱ्याचा ढीग हा एम्पायर स्टेट बिल्डींग सारख्या दोनशे इमारतींइतका होईल. माणसाच्या अनावश्यक गरजांमुळे इ-कचरा वाढतच आहे. दर वेळी लोक मोबाइल फोन बदलतात. केवळ कंटाळा आला म्हणून एक मोबाईल टाकून नवीन घेतला जातो. झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट, युनिव्हर्सटिी ऑफ क्वीन्सलँड, आयआयटी कानपूर या संस्थांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते. टाटा स्टीलचे श्रीकांत मोकाशी यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे आयुर्मान वाढवणे आवश्यक आहे. एखाद्या उद्योगात ही उपकरणे निरूपयोगी झाली असतील तर ती दुसरीकडे वापरता येतील. मोबाइल फोन, लॅपटॉप यामुळे इ-कचरा वाढला. कबाडीवाल्यांना इ-कचरा हाताळण्याचे प्रशिक्षण नसते त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात. कबाडीवाल्यांना म्हणजे कचरा गोळा करणाऱ्यांनाही प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

क्वीन्सलँड विद्यापीठाचे अँथनी हालाँग यांनी सांगितले की, इ-कचऱ्यावर प्रक्रिया करणे पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहे, कारण या कचऱ्याने जागतिक तापमान वाढीची समस्या वाढली आहे.