राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे. तत्पूर्वीच अयोध्यातून आजपासून (मंगळवार) राम राज्य रथयात्रेचा शुभारंभ होणार आहे. ही यात्रा तामिळनाडूतील रामेश्वरम येथे संपणार असून दोन महिन्यात सहा राज्यातून ही यात्रा प्रवास करेल.

एका टाटा मिनी ट्रकला रथाचे स्वरूप देण्यात आले आहे. ही यात्रा भाजपाशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्राशिवाय काँग्रेस शासित कर्नाटकमधून जाणार आहे. कर्नाटकमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे राज्य मिळवण्याचा भाजपाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही यात्रा अंतिम टप्प्यात केरळमधून जाईल. या राज्यात भाजपा आपले पंख पसरवू पाहत आहे. अधिकृतरित्या ही रथयात्रा महाराष्ट्रातील एका सामाजिक संघटनेद्वारे आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघ-भाजपाशी वैचारिक साम्य असणारे विश्व हिंदू परिषद आणि मुस्लिम राष्ट्रीय मंच सारख्या संघटना सहभागी होत आहेत.

अयोध्येत १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिरासाठी अभियान सुरू केले होते. या यात्रेनंतरच भाजपा देशातील एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणून पुढे आला. गेल्या काही वर्षांत भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात हा मुद्दा पहिल्या पानावरून शेवटच्या पानांवर ढकलला होता. इतकंच काय तर मागील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही हा प्रमुख मुद्दा नव्हता.

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता हाती आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत राम मंदिरची निर्मिती करणे भाजपाचा मुख्य अजेंडा असल्याचे आश्वासन दिले होते. राम राज्य रथयात्रा मंगळवारी सांयकाळी अयोध्येतील करसेवकपूरम येथून सुरू होईल. करसेवकपूरम ही ती जागा आहे, जिथे १९९० मध्ये विश्व हिंदू परिषदेने एका कार्यशाळेची उभारणी केली आहे. येथे राम मंदिरासाठी खांब तयार करण्याचे काम होते.

दरम्यान, अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे जफरयाब गिलानी यांनी मशिदीची मागणी सोडणार नसल्याचे ठामपणे म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयात आपण कोणताही हस्तक्षेप करणार नाही. रथयात्रा कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रकरण आहे, त्यामुळे सरकारने या मुद्यावर विचार करावा, असेही त्यांनी म्हटले.