23 July 2019

News Flash

इंधनाचा भडका!

मुंबईत पेट्रोल ८६.२५, तर डिझेल ७५.१२ रुपये प्रतिलिटर

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईत पेट्रोल ८६.२५, तर डिझेल ७५.१२ रुपये प्रतिलिटर

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने रविवारी नवा उच्चांक गाठला. सरकारी तेलकंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार मुंबईत एक लिटर पेट्रोलला ८६.२५ रुपये, तर डिझेलला ७५.१२ रुपये मोजावे लागत आहेत.

मुंबईत पेट्रोल ३२ पैशांनी, तर डिझेल ५८ पैशांनी महागले आहे. गेल्या आठवडाभरात झालेली ही तिसरी इंधन दरवाढ आहे. तेलकंपन्यांनी शुक्रवारीच इंधनाचे दर वाढवले होते. त्यानंतर रविवारी लगेच वाढ करण्यात आल्याने दराने उच्चांक गाठला आहे. ही दरवाढ मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या चार मोठय़ा शहरांमध्ये शनिवार, १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आल्याचे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने स्पष्ट केले.

प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.

दरम्यान, गेल्या शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ७१ पर्यंत घसरला. रूपयाच्या घसरगुंडीमुळे इंधनदरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अर्थातच महागाईत भर पडण्याचे संकेत आहेत.

मुंबईत सर्वाधिक मूल्यवर्धित कर

मुंबईत पेट्रोलवर सर्वात जास्त म्हणजे ३९.१२ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) घेतला जातो. त्यामुळे मुंबईतील इंधनाचे दर अन्य शहरांपेक्षा जास्त आहेत. दिल्लीत पेट्रोलवर २७ टक्के आणि डिझेलवर १७.२४ टक्के व्हॅट घेतला जात असल्याने तेथील इंधनदर मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यापेक्षा कमी आहेत.

First Published on September 3, 2018 1:41 am

Web Title: fuel hike in mumbai