विनाअनुदानित सिलींडरच्या किमतीत ५९ रूपयांनी वाढ

पेट्रोल, डिझेल दरवाढ सुरू असतानाच रविवारी स्वयंपाकाच्या गॅस सिलींडरच्या किमतीचाही भडका उडाला. अनुदानित सिलिंडरच्या किमतीत २.८९ रुपयांनी, तर विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत ५९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

स्वयंपाकाच्या अनुदानित गॅसच्या सिलिंडरची किंमत २.९ रुपयांनी वाढल्याने ती आता ५०२.४ रुपये झाली आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडर ५९ रुपयांनी महागणार आहे. यामुळे विनाअनुदानित सिलींडरसाठी ग्राहकांना सोमवारपासून जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

ही वाढ प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय दरांतील बदल व परकीय चलनातील चढउतार यांमुळे झाल्याचे तेल कंपन्यांनी नमूद केले आहे. सिलिंडरवरील अनुदानापोटी ग्राहकाच्या खात्यात सप्टेंबपर्यंत जमा होणारी ३२०.४९ रुपयांची रक्कम वाढवून ऑक्टोबरपासून सिलिंडरमागे ३७६.६० रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे अनुदानित एलपीजी ग्राहकांना या वाढीपासून संरक्षण मिळाले असल्याचाही दावा इंडियन ऑइलने केला आहे.

दोन महिन्यांत इंधनदरात ८ ते दहा टक्यांनी वाढ

सरकारी तेल कंपन्यांनी रविवारीही इंधनाच्या दरात वाढ केली. मुंबईत पेट्रोलचा प्रतिलिटर दर ९० रुपये ८४ पैसे, तर डिझेलचा प्रतिलिटर दर ७९ रुपये ४० पैसे एवढा झाला. गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलचे दर ८ टक्क्यांनी, तर डिझेलचे दर १० टक्क्यांनी भडकले आहेत.