देशभरात सातत्याने वाढणारे पेट्रोल डिझेलचे भाव जनसामान्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. मात्र एका भाजपा खासदारांनी मात्र ही इंधन दरवाढ काँग्रेसच्या प्रोपगंडाचा भाग ठरवली आहे. भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हे विधान केलं आहे.

भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर या भोपाळ महापालिकेच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. नवीन बसेसचं लोकार्पण आणि नव्या पंपहाऊसचं उद्घाटन असा हा कार्यक्रम होता. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून हे उद्घाटन केलं.

यावेळी बोलताना ठाकूर म्हणाल्या, हे लोक जे प्रोपगंडा पसरवत आहेत की पेट्रोल महाग झालंय, डिझेल महाग झालंय. महागाई वगैरे काही नाहीये, ही काँग्रेसची मानसिकताच आहे. फुकटचा प्रोपगंडा आहे. त्याचबरोबर प्रदुषणमुक्त गाड्या उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री चौहान यांचे आभारही मानले आहेत. त्या म्हणाल्या, पूर्वी रिक्षातून जाताना तोंडाला रुमाल लावावा लागत होता. कारण, धूळ आणि प्रदुषणचं इतकं होतं.

तर काँग्रेसनेही ठाकूर यांच्या या विधानावर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी याबद्दल ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, पूर आला..काँग्रेसमुळे? महागाई आली..नेहरुंच्या भाषणामुळे? महागाईची अडचण आहे तर अफगाणिस्तानात जा? आणि आता प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणतायत की महागाई वगैरे काही नाही, ही काँग्रेसची मानसिकताच आहे, त्यांचा प्रोपगंडा आहे? यांचं मानसिक संतुलन तपासायला हवं.