सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मागच्या सात दिवसात प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात ३ रुपये ९० पैसे तर डिझेलच्या दरात चार रुपयापर्यंत वाढ झाली आहे. आज प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात ५९ पैसे तर डिझेलच्या दरात ५८ पैशांची वाढ झाली. करोना व्हायरसमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका बसत आहे.

दिल्लीमध्ये आज प्रतिलिटर पेट्रोलचा दर ७५.१६ पैसे, मुंबईत ८२.१० पैसे, चेन्नईत ७८.९९ पैसे आणि कोलकात्यात ७७.०५ पैसे आहे.

प्रतिलिटर डिझेलचे दर दिल्लीमध्ये ७३.३९ पैसे, मुंबई ७२.०२ पैसे, चेन्नईत ७१.६४ पैसे आणि कोलकात्यात ६९.२३ पैसे आहे.

मागणी घटल्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाचे दर पडलेले असताना भारतात दररोज इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. १२ आठवडे पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे होते. त्यानंतर आता सलग सहा दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. देशांतर्गत कर लावल्यामुळे इंधनाचे दर आणखी वाढू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे.

शुक्रवारी पेट्रोलच्या दरांमध्ये प्रतिलिटर ५७ पैशांनी वाढ करण्यात आली तर डिझेलच्या दरांत प्रतिलिटर ५९ रुपयांची वाढ करण्यात आली होती. दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये गुरुवारी प्रत्येकी 60 पैशांची वाढ करण्यात आली होती.