मेहुल चोक्सीला भारताकडे सुपूर्द करायचं की नाही? यासंदर्भातला निकाल गुरुवारी येण्याची शक्यता आहे. डोमिनिका येथील स्थानिक न्यायालयात यासंदर्भात सुनावणी सुरू असून त्याचा निकाल न्यायालयानं उद्यापर्यंत राखून ठेवला आहे. या सुनावणीसाठी मेहुल चोक्सी देखील ऑनलाईन हजर होता. याशिवाय ईडी आणि सीबीआयची टीम देखील आपली बाजू मांडण्यासाठी हजर होती. या सुनावणीदरम्यान खुद्द डोमिनिका सरकारने देखील मेहुल चोक्सीला भारताला सोपवण्यात यावं, असं न्यायालयात सांगितलं. यासंदर्भात दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने उद्यापर्यंत निकाल राखून ठेवला आहे.

पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सीविरोधात डोमिनिका कोर्टात ही सुनावणी सुरु आहे. या निकालावर मेहुल चोक्सीचं भवितव्य अवलंबून आहे. मेहुल चोक्सीला अँटीग्वात पाठवणार? की, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा होणार? हे या निकालावर अवलंबून आहे. मेहुल चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळाला होता. २०१८ पासून मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये वास्तव्यास होता.

इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसीच्या आधारावर मेहुल चोक्सीला भारतात आणणं शक्य आहे. सध्या मेहुल चोक्सी अँटिग्वाचा नागरिक असल्याचा दावा करत आहे. मात्र भारताने त्याचं नागरिकत्व अजून रद्द केलेलं नाही. त्यामुळे तो भारतीय नागरिक असल्याचं सिद्ध होईल आणि त्याला भारतात आणणं सोपं होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे. चोक्सीला आणण्यासाठी सीबीआय आणि ईडीची टीम डोमिनिका येथे पोहोचली आहे.

“माझ्या पतीची प्रकृती ठीक नसते. माझे पती अँटिग्वाचे नागरिक आहेत. त्यांना तेथील संविधानानुसार सर्व  सुरक्षा मिळण्याचा अधिकार आहे. माझे पती सुरक्षितरित्या अँटिग्वा येथे येतील यावर माझा विश्वास आहे. “, असं मेहुल चोकसीच्या पत्नीनं एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं.

पोलीस नव्हे, देवदूत! जखमी महिलेला झोळीत घेऊन अ‍ॅम्ब्युलन्ससाठी ४ किलोमीटरची पायपीट

पंजाब नॅशनल बॅकेत १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी फरार झाले आहेत. नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. तर मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये लपून बसला होता. मात्र २३ मे रोजी नाट्यमयरित्या मेहुल चोक्सी पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्याला भारतात आणण्यासाठी तपास यंत्रणा डोमिनिका येथे पोहोचल्या आहेत.