देशामध्ये सध्या करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या कमी झाली असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी झालाय. मात्र याचदरम्यान स्वयंघोषित संत नित्यानंदचा एक व्हिडीओ समोर आलाय. मी भारतामध्ये पाऊल ठेवल्यानंतरच करोनाचा कहर थांबले आणि करोना पूर्णपणे नष्ट होईल, असा दावा या व्हिडीओमध्ये तो त्याच्या भक्तांसमोर करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नित्यानंदचा एक भक्त त्याला भारतामधून करोना कधी नष्ट होणार असा प्रश्न विचारतो. त्यावर उत्तर देताना नित्यानंदने, देवीने माझ्या अध्यात्मिक शरीरामध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं. मी जेव्हा भारतामध्ये पाऊल ठेवेन त्याचवेळी करोना भारतामधून नष्ट होईल, असंही पुढे नित्यानंद म्हणालाय.

नक्की पाहा >> लस At First Sight… ‘या’ फोटोवरुन नेटकऱ्यांमध्येच जुंपली; जाणून घ्या नक्की घडलंय काय?

प्रवेश बंदीचा आदेश

नित्यानंदने १९ एप्रिल रोजी भारतामध्ये करोना लाटेच्या दुसऱ्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याने वसवलेल्या कैलासा देशात भारतीय भक्तांना प्रवेशबंदी जाहीर केली होती. त्याने ब्राझील, युरोपीयन देश आणि मलेशियामधून येणाऱ्या भक्तांवरही बंदी घातलीय. करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आदेश काढताना जगभरातील आश्रमही बंद करण्याच्या सूचना नित्यानंदने दिल्या होत्या. तसेच आश्रमातील भक्तांनाही कैलासात प्रवेश नाकारण्यात आला आहे. नित्यानंदने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली होती.

नक्की वाचा >> “अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास करोना नष्ट होईल”; सपा खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

कैलासा नेमका कुठे?

नित्यानंदने वसवलेलं कैलासा बेट जगाच्या पाठीवर नक्की कुठे आहे याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण विविध माहितीच्या आधारे इक्वेडोर किंवा ऑस्ट्रेलियाच्या जवळपास कुठेतरी हे बेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियातून कैलासावर जाण्यासाठी नित्यानंद याने ‘गरूडा’ नावाची चार्टर्ड फ्लाईट सर्व्हिसही सुरू केल्याची चर्चा आहे. तर नित्यानंदने कैलासात आपलं सरकार, मंत्री, मंत्रालय यासह बँक, मॉल आणि अन्य सुविधा सुरु केल्याचाही दावा केला आहे.

नक्की वाचा >> Coronavirus in UP : कोण क्रिटीकल आहे पाहण्यासाठी बंद केला ऑक्सिजन पुरवठा; २२ जणांचा मृत्यू?

कोण आहे नित्यानंद?

नित्यानंद हा मूळचा तामिळनाडूचा आहे. त्याचे खरं नाव राजशेखरन असं आहे. २००० साली त्याने बंगळूरु शहराजवळ स्वत:चे आश्रम सुरु केले. तेव्हापासूनच तो चर्चेत आला. तो स्वत:ला ईश्वराचा अवतार मानतो. २०१० साली त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर बलात्कार प्रकरणात पौरुषत्वाची चाचणीचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. गुजरात पोलिसांनी नित्यानंदने भारतामधून पलायन केल्याची माहिती न्यायलयाला दिली. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ साली नित्यानंदला जामीन मंजूर झाला. याचाच फायदा घेत तो देशातून पळून गेला.