करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतर २५ मार्चपासून बंद करण्यात आलेली रेल्वेची प्रवासी वाहतूक उद्यापासून (१२ मे) टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने रविवारी जाहीर केला. सुरुवातीला नवी दिल्लीहून ये-जा करणाऱ्या १५ राजधानी मार्गावर या फेऱ्या पूर्ण क्षमतेनिशी धावणार असून त्यासाठीच्या आरक्षणाला आज संध्याकाळी चार वाजल्यापासून सुरुवात होईल. सुरूवातीला रेल्वेच्या १५ जोड्या म्हणजेच एकूण ३० फेऱ्या होणार आहेत. तसंच यासोबत राज्य सरकारांच्या विनंतीप्रमाणे श्रमिक ट्रेनही सुरूच ठेवण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

तिकीट किती आणि प्रवासाचे नियम :-
पहिल्या टप्प्यात नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रलसह देशभरातील १५ राजधानी मार्गावर ३० फेऱ्या धावणार आहेत. या सर्व गाडय़ा पूर्णपणे वातानुकूलित राहणार असून संपूर्ण प्रवासी क्षमतेसह (एका डब्यात ७२ प्रवासी) या गाडय़ा धावतील. तसेच राजधानी एक्सप्रेसच्या तिकीटादराप्रमाणे भाडे आकारले जाईल असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. सर्व प्रवाशांना नाकातोंडावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. करोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच प्रवासाला परवानगी देण्यात येईल. तसेच, प्रवाशांना ‘आरोग्यसेतू’ अ‍ॅप अनिवार्य असेल. या रेल्वेगाडय़ा राजधानी दर्जाच्या असल्या तरी, प्रवाशांना चादरी आणि बेडशिट पुरवले जाणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. तसेच डब्यांतील वातानुकूलनाचे प्रमाण कमी असेल व ताज्या हवेचा पुरवठा जास्तीत जास्त होईल, याची दक्षता घेण्यात येईल. या गाडय़ांसाठी केवळ ऑनलाइन तिकीट नोंदणी तेही IRCTC च्या संकेतस्थळावरुनच बूकिंग करता येईल. रेल्वे स्थानकांतील आरक्षण सुविधा व तिकीट खिडक्या बंदच राहतील. निश्चित (कन्फर्म) तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. प्रवाशांची स्थानकात प्राथमिक तपासणी करण्यात येईल.

नवी दिल्ली- मुंबई सेंट्रल स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक :-
रेल्वेने जाहीर केलेल्या १५ गाड्यांमध्ये नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल या स्पेशल गाडीचाही समावेश आहे. ही गाडी प्रवासादरम्यान बोरीवली, सुरत, वडोदरा , रतलाम आणि कोटा या स्थानकांवर थांबेल. मुंबई सेंट्रल स्थानकावरुन ही स्पेशल ट्रेन संध्याकाळी ५.३० वाजता नवी दिल्लीसाठी सुटेल. तर, नवी दिल्लीवरुन ही गाडी संध्याकाळी ४.५५  वाजता मुंबईसाठी निघेल.

नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल वगळता अन्य १४ गाड्या कोणत्या? –
नवी दिल्ली ते दिब्रुगढ,
नवी दिल्ली ते आगरतळा,
नवी दिल्ली ते हावडा,
नवी दिल्ली ते पाटणा,
नवी दिल्ली ते रांची,
नवी दिल्ली ते बिलासपूर,
नवी दिल्ली ते भुवनेश्वर,
नवी दिल्ली ते सिकंदराबाद,
नवी दिल्ली ते बंगळूरू,
नवी दिल्ली ते चेन्नई,
नवी दिल्ली ते थिरूवनंतपुरम,
नवी दिल्ली ते मडगाव,
नवी दिल्ली ते अहमदाबाद,
नवी दिल्ली ते जम्मू तावी.